‘कृत्रिम पलेमिंगों'वर करोडो रुपयांची उधळण

वाशी : स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ मध्ये नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरात हजारो कृत्रिम पलेमिंगो बसवून नवी मुंबई शहराला पलेमिंगो सिटी  म्हणून नावारुपास आणले. मात्र, याच पलेमिंगो सिटीतील खऱ्या  ‘पलेमिंगों'चे वास्तव्य असणाऱ्या ३०० एकर पाणथळ जागेवरील आरक्षण उठवून त्या जागेवर सिमेंटच्या इमारती उभा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा आणि सिडको प्रशासनाच्या हुकूमशाहीचा पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून, त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तीर्ण खाडीकिनारा पसरला असल्याने या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पलेमिंगो पक्षी येतात. सुरुवातीला फक्त थंडीच्या काळात येणाऱ्या पलेमिंगो पक्षाला येथील वातावरणाबरोबर खाद्य मिळू लागल्याने जवळपास ७ ते ८ महिने ‘पलेमिंगों'चा मुक्काम नवी मुंबई मधील खाडीकिनारी पडू लागला आहे. नेरुळ येथील चाणक्य तलाव आणि डीपीएस स्कूल शेजारील तलावात ‘पलेमिंगों'चा अधिवास मोठ्या संख्येने दिसून येतो.

परदेशातून नवी मुंबईतील खाडीकिनारी येणाऱ्या ‘पलेमिंगों'ना पाहण्यासाठी नवी मुंबईबरोबर मुंबई, ठाणे येथील पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, आता नवी मुंबई मध्ये आरक्षित असलेली पाणथळ जागा संपवण्याचा निर्णय ‘सिडको'ने घेतला असून, त्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. जवळपास ३०० हेक्टर पाणथळ जागेवरील आरक्षण उठवून येथे निवासी क्षेत्र उभा राहणार आहे. त्यामुळे एकीकडे नवी मुंबई शहरात करोडो रुपये खर्च करुन कृत्रिम पलेमिंगो बसवून नवी मुंबई शहराला ‘पलेमिंगो सिटी'ची उपाधी देणाऱ्या महापालिकेने खऱ्या ‘पलेमिंगों'च्या अधिवास जागेवर मात्र घाला घातला आहे. याला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. महापालिकेनं पाणथळ जागांचे आरक्षण कायम न ठेवल्यास आपण न्यायालयात जावू, असा इशारा पर्यावरण प्रेमी सुनिल अग्रवाल आणि भारत गुप्ता यांनी दिला आहे.
--------------------------------------
नेरुळ येथील आरक्षित पाणथळ जागेवरील आरक्षण उठवण्यास पर्यावरण प्रेमींबरोबर शिवसेना पक्षाने (उबाठा) देखील विरोध केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांनी नेरुळ, सीवूडस येथील पानथळ जागेस भेट देऊन पाहणी केली होती. तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण पर्यावरण प्रेमींबरोबर असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिकेच्या भुमिकेवर शंका व्यक्त केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या उद्योगपतींसाठी पाणथळ असलेली जमीन निवासी संकुलासाठी आंदण दिली जाणार असल्याने या विरोधात आपण आंदोलन करणार आहे. - समीर बागवान, सीवूडस विभागप्रमुख - शिवसेना (उबाठा) 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढते उन, रमजान पार्श्वभूमीवर कलिंगड मागणीत वाढ