पाणी कनेक्शन नसतानाही पाणीपट्टीचे बिल

  कल्याण : टिटवाळ्याजवळील उंचवट्यावर असलेल्या मोरया नगर फेज टू या नागरी लोक वसाहतीत राहत असणाऱ्या रहिवाशांना पाईपलाईन पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी टाकूनच दिली नसल्याचे दिसून येत असताना पाणीपुरवठा कनेक्शन नसतानाही येथील एका महिलेच्या नावे पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणी बिलाची पाणीपट्टी देऊ केल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे.

टिटवाळा नजीक गोवेली रोडवर मोरया नगर येथे नागरिक आपल्या परिवारासह वास्तव करून चाळीत राहत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मूलभूत गरज समजल्या जाणाऱ्या या वसाहतीत पाईपलाईन टाकली नसल्याने बोरवेल व टँकरच्या पाण्यावर तहान भागवली जात आहे. आठवड्यातून येथील रहिवासी पैसे जमा करीत पाणी टँकर मागविला जात असल्याने टँकरचे पाणी भरण्यासाठी मोठी झुंबड उडत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे टिटवाळा व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात शेकडोच्या संख्येने अनधिकृत चाळी निर्माण झाल्याने अगोदरच या ठिकाणी कमी पाणीपुरवठ्याच्या होणाऱ्या त्रासात आणखीनच भर पडल्याचे दिसून येत आहे.

टिटवाळ्यात नवनवीन उभारले जाणारे बांधकाम प्रकल्पामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढीस लागल्याचे चित्र असून गेल्या काही वर्षापासून आहे त्या स्थितीतील पाणीपुरवठ्यात सुधारणा न करता पाणी वितरण केले जात आहे. यामुळे नावारूपाला आलेला टिटवाळा परिसर मात्र मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने तहानलेला असल्याचे दिसून येत आहे. अमृत योजनेत जलकुंभ होतीलच मात्र नागरिकांना सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याने व्याकुळ करून टाकले आहे. चाळ माफिया यांनी मोठ्या प्रमाणात दिसेल त्या जागेवर शेकडोच्या संख्येत चाळी बांधत घरे विक्रीसाठी खुले केल्याने यामध्ये नागरिकांची पाण्याअभावी मोठी फसगत झाल्याचे समोर येत आहे. 

पाण्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय येथे उद्भवली असल्याने मोरया नगर वसाहतीला पाण्याची पाईपलाईन टाकून न दिल्याने गेल्या दहा वर्षापासून पाणीपुरवठ्यापासून ही नागरी वसाहत वंचित ठेवली गेली आहे. पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे येथील निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केल्याने मोरया नगरचे नागरिक कमालीचे संतप्त झाल्याचे दिसून येत आहे.

मोरया नगर येथील वसाहतीला  पाणीपुरवठा जोडणी दिली नसून मात्र गेल्या काही वर्षापासून सुमन नारायण राव या महिलेच्या नावावर केडीएमसी कडून पाणीपट्टी बिल दिले जात आहे. पालिकेचे पाणी कनेक्शन तर दूरच असून येथे पाणीपुरवठ्याची पाईपलाईनच अस्तित्वात नसल्याचे दिसून येत आहे. पालिकेचे पाणी कनेक्शन येथे दिले गेले नसल्याने पाणी बिल कसे येते असा सवाल निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राहुल साळवे यांनी उपस्थित केला आहे. पाणी कनेक्शन नसलेल्या पाणीपट्टी बिलाची थकीत रकमेचे बिल काढले गेल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सावळा गोंधळ येथे मात्र उघडकीस आला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘कृत्रिम पलेमिंगों'वर करोडो रुपयांची उधळण