तुर्भे येथील पदपथावर आंब्याच्या लाकडी पेट्यांचे अतिक्रमण
तुर्भे : नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे तुर्भे येथील एपीएमसी फळ मार्केट ते भाजी मार्केट पर्यंतच्या पदपथावर आंब्याच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या लाकडी पेट्यांची विक्री करणाऱ्यांनी बेकायदेशीरपणे व्यवसाय चालवला आहे. या अतिक्रमणावर कारवाई करुन पदपथ चालण्यासाठी मोकळे करुन द्यावेत, अशी मागणी पादचाऱ्यांकडून केली जात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजाराची ओळख आहे. या बाजारपेठेमध्ये आंब्याच्या हंगामात आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या आंब्याच्या पॅकिंगसाठी विविध जिल्ह्यातून लाकडी पेट्यांद्वारे आंब्याची पॅकिंग होऊन येते. तसेच अन्य राज्यांमधून येणारा आंबा ट्रकमध्ये खुला किंवा काही प्रमाणामध्ये क्रेट मध्ये भरुन येतो. महाराष्ट्रामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग, देवगड, रत्नागिरी आदी ठिकाणचा आंबा लाकडी पेट्यांमध्ये सुक्या गवताच्या पेंढ्यामध्ये भरुन येतो. सदर आंबा घाऊक बाजारामध्ये किरकोळ विक्रेत्यांना विक्री केल्यावर बहुतांशी लाकडी पेट्या पुन्हा आंबा बागातदारांकडे पाठवल्या जातात किंवा त्याची विक्री केली जाते. यापूर्वी आंबा पेटी विक्रीचे व्यवसाय एपीएमसी फळ मार्केट मधील एन विंग लगतच्या मोकळ्या जागेमध्ये केले जात होते. परंतु, मागील वर्षी या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे एपीएमसी सचिवांनी ज्वलनशील वस्तू एपीएमसी मार्केटमध्ये ठेवण्यास मनाई केली. त्यामुळे मागील वर्षीपासून लाकडी पेट्यांची पुनर्विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी एपीएमसी फळ मार्केट ते भाजी मार्केट पर्यंतच्या पदावर राजरोसपणे या लाकडी पेट्याची साठवणूक करणे, त्या दुरुस्त करणे आणि विक्री करणे यांचा व्यवसाय चालू केला आहे. याशिवाय आंबा पुठ्याच्या बॉक्समध्ये आणि लाकडी पेट्यांमध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्याकरिता सुक्या गवताचा घास भरला जातो. त्या घासाची विक्री देखील याच पदपथावर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भाजी मार्केट लगतच्या टाटा पॉवर कंपनीच्या उच्चस्तरीय विद्युत वाहिन्या खालील मोकळा भूखंड एका माजी लोकप्रतिनिधींच्या २ कार्यकर्त्यांनी बळकावला आहे. या ठिकाणी त्यांनी विद्युत वाहिनीला हात टेकेल इतक्या उंचावर या लाकडी पेट्यांचे थरावर थर रचले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एखादी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी होण्याची शक्यता तुर्भे मधील नागरिक वर्तवित आहेत.