सीवूडस मधील कमळ तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर?

वाशी : एकेकाळी कमळांच्या फुलांनी सदैव बहरलेल्या नेरुळ, सीवूडस सेक्टर-२७ मधील लोटस तलावात डेब्रिज टाकण्याचे काम सुरु आहे. यामुळे संपूर्ण तलावाची रया गेली असून, तलाव भकास होत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच या तलावाचे संवर्धन न केल्यास भविष्यात लोटस (कमळ) तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

नवी मुंबई शहरातील नैसर्गिक संपदा, नैसर्गिक पाणथळ, कांदळवन यांचे जतन-सरंक्षण- संवर्धन करणे, नवी मुंबई शहराचे शिल्पकार या नात्याने ‘सिडको'ची तर शहराची महापालिका या नात्याने नवी मुंबई महापालिकेचे संविधानिक उत्तरदायित्व ठरते. मात्र, आज नवी मुंबई शहरातील नैसर्गिक संपदा नष्ट  होत असल्याचे चित्र दिसत आहे. आधीच पाणथळ क्षेत्र हटवून त्या ठिकाणी सिमेंटचे इमले उभारले जात आहेत.तर आता नवी मुंबई शहरातील उरले सुरले तलाव देखील लवकरच लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत.

नेरुळ, सीवूड सेक्टर-२७ स्थित लोटस तलावात डेब्रिज टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. याशिवाय पूर्वी कमळाच्या फुलांनी बहरत असलेल्या तलावाच्या ठिकाणी वर्तमानात शिंगाड्याची अनधिकृत शेती केली जात असल्याचे उघडपणे दिसते आहे .तसेच या तलावाच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असून देखील नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासन या तलावातील नैसर्गिक संपदेला हानी पोहचवली जात असताना केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका आणि सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले तर येत्या काही दिवसात लोटस तलाव नामशेष होण्याची शवयता पर्यावरणप्रेमी वर्तवित आहेत.

नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाने नैसर्गिक संपदा आणि पर्यावरण जतन -संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी लोटस तलावाला डेब्रिजचा, कचऱ्याचा, जंगली झुडपांचा पडलेला विळखा दूर करण्यासाठी लोटस तलावाची स्वच्छता तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर भविष्यात तलावाला भूमाफियाच्या माध्यमातून हानी पोहचली जाऊ नये यासाठी तलावाभोवती जाळीचे कंपाउंड बांधून त्याच्या बाहेरील बाजूला वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याची तसेच तलावाभोवती विद्युत पोल बसवून कोणतीही हानी न पोहचवता तलावाचे सुशोभिकरण तातडीने करण्याची गरज आहे. - सुधीर दाणी, सदस्य - सजग नागरिक मंच, नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वेगवान विकासासाठी जबाबदार नागरिक भावना महत्वाची -आयुवत जाखड