सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांसाठी १६ कोटी खर्चाची सुविधा कामे

नवी मुंबई : आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याचबरोबर विकास कामांचे भूमीपुजन देखील जोरात सुरु आहेत. ‘नवी मुंबई'च्या विकास बरोबरच आपल्या मतदारसंघामध्ये मुलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते, या अनुषंगाने आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ आणि वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी आणि वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणा करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी बेलापूर जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे अशा कामांचे भूमीपुजन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.  

दरम्यान, जागेची पाहणी करुन नवी मुंबईतील नागरिकांना ज्या काही सोयी-सुविधा अग्रक्रमाने पाहिजे त्यानुसार सदरचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर कामे लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती भूमीपुजन समारंभास उपस्थित असलेल्या ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'मधील अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या आठवड्यापूर्वी ‘पीडब्ल्यूडी'च्या माध्यमातून सायन-पनवेल महामार्गावर वाशी, एलपी-नेरुळ, सीबीडी-बेलापूर, आदि ठिकाणी बाहेरगावी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस थांबत असतात. वाशी, नेरुळ, बेलापूर येथे हि एसटी थांबे आहेत. या थांब्यावर प्रवाशांना कोणतीही सुविधा नसल्याने अनेकदा प्रवाशी त्रासलेले आढळतात. त्यामुळे आता सदर थांब्यांवर प्रवाशांकरिता प्रतिक्षा कक्ष, उद्यान तसेच शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्याचबरोबर रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करुन वाहनांना ये-जा करण्याकरिता सोयीचे होणार असून पावसाळ्यात खड्डे पडून जे अपघात होतात, त्यांचे प्रमाण कमी होणार आहे. त्याकरिता सदर सर्व कामांसाठी ‘पीडब्ल्यूडी'मार्फत तब्बल १६.३८ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत ‘पीडब्ल्यूडी'चे उपविभागीय अभियंता पवार, कार्यकारी अभियंता कल्याणी गुप्ता, शाखा अभियंता सागर भुले, शाखा अभियंता जगदाने, दत्ता घंगाळे, सुधीर जाधव, प्रवीण भगत, रुपेश मढवी, ज्ञानेश्वर कोळी, जयराम पासवान, आरती राऊळ, चैताली ठाकूर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष'ची राज्यात उभारणी -उपमुख्यमंत्री फडणवीस