मालमत्ता कर वसुलीची मोहीम महापालिकेने केली तीव्र

पनवेल : पनवेल महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्यावतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली असून, वसुली पथकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आयुक्त  गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार जप्ती नोटिसांचे वाटप केलेल्या थकबाकीदारांच्या गृहभेटीवर भर देण्यात येत आहे. तसेच  औद्योगिक व व्यवसायिका थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुली साठी धडक मोहीम सुरू केली आहे. तसेच थकबाकीदारांवर अटकावणीच्या कारवाईसही सुरूवात करण्यात आली आहे.

आज अखेर चारही प्रभागांमध्ये नऊ पथकांच्या माध्यमातून पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे कर वसुलीमध्येही  गेल्या दोन दिवसांमध्ये दोन कोटीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या आर्थिक वर्षात 273 कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. तसेच आत्तापर्यंत एकुण ५६० कोटी मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान  मा. उच्च न्यायालयाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही  स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. याच वेबसाइटवर मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने  'सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड ' तयार केले आहे. याचा लाभ मालमत्ता धारकांनी घ्यावा. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास  1800-5320-340   या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रायगड जिल्ह्यासाठी २६०० कोटींचे १७ सांमजस्य करार