रायगड जिल्ह्यासाठी २६०० कोटींचे १७ सांमजस्य करार

नवीन पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने मोठ्या उद्योजकांबरोबरच छोट्या उद्योजकांना देखील सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची शासन काळजी घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी २६०० कोटी रुपयांचे १७ सांमजस्य करार करण्यात आले.

पनवेल येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद'मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे विजु सिरसाठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी. हरळय्या, आदि उपस्थित होते.

उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद'चे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. समुद्र किनारी असलेल्या जिल्ह्यामध्ये उद्योजक गुंतवणूक करत आहेत. स्थानिक स्तरावर १ लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. ५० लाखाच्या प्रोजेक्टला देखील रेड कार्पेट  मिळाले आहे. छोटे आणि स्थानिक उद्योजक शासनाच्या दृष्टीने महत्वाचे  आहेत. ‘अटल सेतू'मुळे रायगड जिल्ह्यात पायाभूत सोयी-सुविधांचा विकास होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ,समृध्दी महामार्गामुळे उद्योग वाढीला चालना मिळणार आहे. देशात परकीय गुंतवणूक आणणारे महाराष्ट्र राज्य एक नंबरला आहे, असे ना. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली मध्ये १००० एकर जागा लॉईडस्‌ कंपनीला दिली  असून ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या जिल्ह्यात झाली आहे. गडचिरोली मध्ये जिंदाल, टाटा ने गुंतवणूक केली असल्याने आगामी एका वर्षात उद्योग नगरी म्हणून गडचिरोली ओळखली जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे १८ ते १९ हजार उद्योजक बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. उद्योगाची भरभराट होण्यासाठी उद्योजकांनी उद्योजक तयार करावेत, असे केले तर बेरोजगारी दूर होईल. उद्योजकांवर कुठलेली संकट येणार नाही, याची काळजी शासन घेईल, असेही ना. सामंत यांनी आश्वासित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘सिडको'च्या विविध प्रकल्पांना व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांची भेट