नवी मुंबईत आता कपड्याचे कचरा व्यवस्थापन

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये देशातील स्वच्छ शहराचे द्वितीय मानांकन मिळविणारे शहर म्हणून नवी मुंबई नावाजले जात असताना नवनवीन संकल्पना राबविण्यात महापालिका नेहमी आघाडीवर असते. घनकचरा व्यवस्थापनातील ओला, सुका, घरगुती घातक अशा तीन प्रकारच्या कचरा वर्गीकरणावर बारकाईने लक्ष दिले जात असताना आता केंद्र सरकारच्या ‘टेक्सटाईल समिती'ने नवी मुंबई महापालिका सोबत सामंजस्य करार (MOU) केला आहे. या माध्यमातून कपड्याच्या ‘कचरा व्यवस्थापन'मध्येही नवी मुंबई या प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणखी एक यशस्वी पाऊल टाकत आहे.

 

नुकताच महापालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ग्राहकांकडून वापरानंतरच्या कापडी कचऱ्याचे व्यवस्थापन करुन या साखळीतील शाश्वतता-पुनर्चक्रीकरण प्रक्रियेचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारच्या ‘टेक्सटाईल समिती'सोबत सामंजस्य करार केला आहे. PILOT PROJECT ON SUSTAINABILITY AND CIRCULARITY IN TEXTILE CHAIN TVC BY MANAGING POST CONSUMER TEXTILE WASTE   या विषयीच्या कराराचा कोणताही आर्थिक भार नवी मुंबई महापालिकेवर पडणार नाही. केंद्र सरकारसोबत अशा प्रकारचा सामंजस्य करार करणारी नवी मुंबई देशातील पहिली महापालिका आहे.
नवी दिल्ली येथे भारत मंडपम सभागृहात झालेल्या सदर सामंजस्य करार स्वाक्षरीप्रसंगी ‘केंद्रीय वस्त्र मंत्रालय'च्या राज्यमंत्री दर्शना जरदोश, वस्त्र मंत्रालय सचिव रचना शाह, ‘वस्त्र मंत्रालय'च्या सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, वस्त्र आयुक्त रुप राशी तसेच महापालिका आयुवत आयुक्त राजेश नार्वेकर यांचे प्रतिनिधी म्हणून ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे आणि अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते.
सदरचा सामंजस्य करार केंद्रीय टेक्सटाईल समिती तसेच नवी मुंबई महापालिका आणि एसबीआय फाऊंडेशन, आयडीएच इंडीया, टिजर आर्टिसन ट्रस्ट यांच्यामध्ये झालेला आहे.

भारतातील उद्योगांमध्ये कापड उद्योग बहुतांश लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणारा दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा उद्योग असून कापडाच्या वाढत्या मागणीमुळे वस्त्रोद्योग पूर्व आणि नंतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. कापडाच्या वापरानंतर साधारणतः ९८ % कचरा घनकचरा प्रकल्पस्थळी जातो. एकूण कार्बन उत्सर्जनातही वस्त्रोद्योगाचा १० % इतका मोठा वाटा असून एकूण कार्बन उत्सर्जनात सदरचा पाचवा सर्वात मोठा वाटा आहे.

वस्त्रोद्योग मूल्य साखळीतून सामाजिक आणि पर्यावरणीय ओझे कमी करण्यासाठी सामुहिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ‘टेक्सटाईल समिती'सोबत सामंजस्य करार करुन नवी मुंबई महापालिकाने एक पर्यावरणशील सकारात्मक पाऊल उचलले आहे. महापालिका क्षेत्रातील वस्त्रोद्योगांमध्ये तसेच कापड वापरानंतरच्या टेक्सटाईल कचरा व्यवस्थापनाबाबत पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी आणि त्याचा सुयोग्य आराखडा तयार करण्यासाठी सदर प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. याची अंमलबजावणी भविष्यात देशाच्या इतर भागातही केली जाऊ शकते. यादृष्टीने सदर प्रकल्प आणि त्याचा सामंजस्य करार महत्वाचा असून ती नवी मुंबई महापालिका साठी ‘स्वच्छता'मध्ये आणखी एक राष्ट्रीय बहुमानास्पद उपलब्धी आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माथाडी नेत्यांचे बेमुदत उपोषण स्थगित