थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी अभय योजना जाहीर  

नवी मुंबई : महापालिकेच्या महसुलाचा सर्वात मोठा स्त्रोत असलेल्या मालमत्ताकर वसुलीसाठी नवी मुंबई महापालिका कडून नियोजनबध्द प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने थकित मालमत्ताकराची प्रभावी वसुली करण्याकरिता महापालिकेने १ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना लागू करुन थकित मालमत्ताकर धारकांना दिलासा दिला आहे. त्यानुसार १ ते २० मार्च या कालावधीत थकीत मालमत्ताकराची रक्कम तसेच २५ टक्के शास्ती भरल्यास शास्तीची ७५ टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २१ ते ३१ मार्च या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम अधिक ५० टक्के शास्ती भरल्यास शास्तीची ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार असल्याचे महापालिका कडून जाहीर करण्यात आले आहे.  

‘अभय योजना'चा लाभ घेण्यासाठी www.nmmc.gov.in या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून सदर सुविधा nmmc e-connect या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे नमुंमपा मुख्यालय, सर्व विभाग कार्यालय, सर्व करभरणा केंद्रांवर उपलब्ध आहे. मालमत्ता कराचा भरणा करण्याची सुविधा नमुंमपा मुख्यालय, सर्व विभाग कार्यालये आणि सर्व करभरणा केंद्रांवर रोख, धनादेश, धनाकर्ष याद्वारे करता येणार आहे. दिलेले धनादेश ‘अभय योजना'च्या कालावधीमध्ये कोणत्याही कारणास्तव न वटल्यास अर्जदारास ‘अभय योजना'चा लाभ मिळणार नाही.

तसेच ज्यांना रोखीने मालमत्ता कराचा भरणा करायचा आहे, त्यांना महापालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस तसेच मोबाईल ऍप  nmmc e-connect  यावरही मालमत्ता कर भरता येणार आहे. अभय योजने अंतर्गत मूळ मालमत्ताकराच्या थकीत रक्कमेत कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. ‘अभय योजना'च्या जाहीर केलेल्या कालावधीमध्ये मूळ मालमत्ताकर तसेच सवलती नंतरच्या शास्तीसह येणारी संपूर्ण देय रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. अंशतः भरलेल्या रक्कमेस ‘अभय योजना'चा लाभ मिळणार नसल्याचे महापालिका कडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

अभय योजना लागू होण्यापूर्वी म्हणजे १ मार्च २०२४ पूर्वी भरणा केलेला मालमत्ताकर तसेच शास्ती किंवा व्याजाच्या रक्कमेच्या संदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही. तसेच त्यांचा परतावा देखील मिळणार नाही. ३१ मार्च २०२४ नंतर मालमत्ताकर अभय योजना शास्ती किंवा व्याज याकरिता लागू राहणार नाही. तसेच शास्ती किंवा व्याज यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात येणार नाही. ‘अभय योजना'ला पुढील कालावधीकरिता मुदतवाढही देण्यात येणार नसून ‘योजना'चा लाभ घेऊन कराचा भरणा केल्यानंतर या भरणा रक्कमेसंदर्भात कोणत्याही प्राधिकरणापुढे अथवा न्यायाधिकरणापुढे कोणत्याही कारणास्तव दावा दाखल करता येणार नसल्याचे महापालिका तर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे.  

मालमत्ता कर महापालिकेच्या महसुलाचा सर्वात मोठा स्त्रोत असून मालमत्ताकर वसुलीकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष लक्ष दिले जात आहे. याकरिता मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सुव्यवस्थित नियोजन केले असून वारंवार आढावा घ्ोत मालमत्ता कर वसुलीला गती दिली आहे. त्याअनुषंगाने थकीत मालमत्ताकराची प्रभावी वसुली करण्याकरिता महापालिकाने मालमत्ता कर अभय योजना लागू केली आहे.  

‘अभय योजना'अंतर्गत थकीत मालमत्ता कर धारकांना १ मार्चपासून पुढील २० दिवसात थकीत मालमत्ताकर भरणा केल्यास दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सवलत तसेच २१ ते ३१ मार्चपर्यंत दंडात्मक रक्कमेवर ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. थकीत मालमत्ता कर धारकांनी सदर सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीवूड्‌स सेवटर-४६ए मध्ये नियमबाह्यरित्या खोदकाम