तुर्भे एमआयडीसी मध्ये आग ; २ कामगारांचा मृत्यू

वाशी : तुर्भे एमआयडीसी मधील खेळणी बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान घडली. या आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या आगीत ३ कामगारांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. तर धुरामुळे श्वास गुदमरुन २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. जितेंद्र शर्मा (वय-४५) आणि शबुल्ला (वय-२८) अशी आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

तुर्भे एमआयडीसी मध्ये डी-२७२ या ठिकाणी गेट वे नावाची खेळणी बनवणारी कंपनी आहे. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान या कंपनीत भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलासह एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आगीमुळे इतर कंपन्यांना धोका असल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी कंपनी परिसरातील कंपन्यांमधील कामगारांना बाहेर सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. कंपनीत खेळणी  बनवण्याचे लाकडी साहित्य असल्याने आगीने पेट घेतला. आग लागली तेव्हा कंपनीत ५ कामगार होते. त्यातील ३ कामगार छतावर चढल्याने त्यांना अग्निशमन दल जवानांनी वाचवले. तर जितेंद्र शर्मा आणि शबुल्ला या दोन कामगारांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. शेवटचे वृत हाती येईपर्यंत अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम सुरु ठेवून कंपनीत आणखी कोणी आहे का?, याचा तपास सुरु होता. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आगळ्या वेगळ्या आयोजनाने साजरा केला मराठी भाषा दिन