थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडीत करण्याचे निर्देश

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी. तसेच थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडीत करावे, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २२३ कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये ८८ कोटी रुपयांची थकबाकी असून १३४ कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहेत. त्यापैकी २२ कोटी रुपयांची थकबाकी तर ५९ कोटी रुपये चालू वर्षाची देयके असे एकूण ८१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्च २०२४ पर्यंत सुमारे १४१ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान पाणी पुरवठा विभागासमोर आहे.

थकबाकी आणि चालू बिले यांची वसुली तातडीने करावी. त्यात हयगय करु नये असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले. सदर बैठकीस उपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास ढोले यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित रकेमाचा भरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदारांचे नळ संयोजन तत्काळ खंडीत करावे. नळ संयोजन परवानगीशिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक, गृहसंकुल यांचे नळ संयोजन मुख्य जलवाहिनीवरुन खंडीत करावेत. आवश्यक ठिकाणी मोटर, पंप जप्त करुन पंपरुम सील करण्याची कारवाई करावी. -संदीप माळवी, अतिरिवत आयुवत (१), ठाणे महापालिका.

प्रभाग समितीनिहाय वसुली टक्केवारीः
वर्तकनगर -४८.६० %, उथळसर -४७.५१ %, लोकमान्य-सावरकरनगर -४१.७० %, मुंब्रा -४१.२९ %, माजिवडा-मानपाडा -४१.१२ %, नौपाडा-कोपरी -३८.२२ %, कळवा -३१.२७ %, दिवा -२५.९२ %, वागळे -१६.६३ %. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खारघरमध्ये मलमिश्रित पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पन्न