खारघरमध्ये मलमिश्रित पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पन्न

खारघर : खारघर, सेक्टर-१२ मध्ये ४ ठिकाणी गळती झालेल्या जलवाहिनीमध्ये सांडपाणी मिश्र होत असल्यामुळे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले असून सदर समस्या दूर करण्यात आल्याचे ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

खारघर, सेक्टर-११ परिसरातील वैभव शाली, महालक्ष्मी, बालाजी, संख्येश्वर, भैरवनाथ आणि इतर सोसायटी तसेच  खारघर, सेक्टर-१२ बीयुडीपी वसाहत मधील ई-टाईप मधील शिवसागर, सूर्योदय, समुद्रिका आणि एफ-टाईप सोसायटी मध्ये   दुषित पाणी पुरवठा झाल्याने रहिवाशांना उलटी, जुलाबमुळे गॅस्ट्रोची साथ आजाराची लागण झाल्याचे प्रकार समोर आले होते. दुषित पाणी पुरवठा होत असून त्याला घाणेरडा वास येत असल्याच्या तक्रारीत वाढ होत होत्या. त्यामुळे ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागाकडून खारघर, सेक्टर-१२ मधील बीयुडीपी वसाहतीत जेसीबीद्वारे खोदकाम करुन दुषित होत असलेल्या जलवाहिनीचा शोध घेतला असता ४ ठिकाणी गळती झालेल्या जलवाहिनी मधून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर गळती झालेल्या जलवाहिनीचा शोध घेवून २ दिवसात समस्या दूर करण्यात आली आहे, असे ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

खारघर, सेक्टर-१२ मध्ये ४ ठिकाणी गळती लागलेल्या जलवाहिनीतून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. गळती झालेल्या सर्व जलवाहिनींचा शोध घेवून समस्या दूर करण्यात आली आहे. -राहुल सरोदे, उपअभियंता-पाणी पुरवठा विभाग, सिडको.

खारघर, सेक्टर-११ आणि १२मध्ये ‘सिडको'कडून दुषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे विविध रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. दुषित पाणी पुरवठा होत असताना ‘सिडको'ने या विषयी जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र, ‘सिडको'ने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना हाल सोसावे लागले. याला सर्वस्वी ‘सिडको'चे अधिकारी जबाबदार आहेत. -प्रवीण पाटील, माजी नगरसेवक, खारघर गांव.

खारघर मध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे माजी नागरसेवक प्रवीण पाटील यांनी २४ फेब्रुवारी रोजी  सेक्टर-११ मधील नाना-नानी पार्क मध्ये रहिवासी आणि सिडको अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात  नागरिक उपस्थित होते. दुषित पाणी पुरवठा होत असताना ‘सिडको'ने नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच दुषित पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे आवश्यक होते. मात्र, या विषयी ‘सिडको'कडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्यामुळे अशी वेळ रहिवाशांवर आल्याचे नागरिकांनी सिडको अधिकाऱ्यांना सुनावले. सदर बैठकीला नागरिक उपचारासाठी झालेल्या बिलाचा तपशील घेवून आले होते. यावेळी माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर तसेच सोसायटीचे सदस्य सोमनाथ कोळी यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘धुतूम'मधील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा