‘केडीएमसी'तर्फे ‘कचरामुक्त तारांकित सोसायटी स्पर्धा'चे आयोजन

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र कचरामुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढावा याकरीता आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ‘कचरामुक्त तारांकित सोसायटी स्पर्धा'चे आयोजन केले आहे.    

या स्पर्धेच्या अनुषंगाने ‘महापालिका-नागरिक सुसंवाद' या उपक्रमाअंतर्गत महापालिका मुख्यालयमध्ये सदर स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, सभासद आणि नागरिक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी महापालिका क्षेत्राची साधारण माहिती, घनकचरा वर्गीकरण, सोसायटी स्तरावर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, महापालिकाद्वारे घनकचरा व्यवस्थापनात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पना, रस्ते स्वच्छता यामध्ये सुधारात्मक उपाययोजना आणि कचरा प्रश्नामध्ये महापालिकेची भूमिका मांडली.

यानंतर ‘कचरामुक्त तारांकित सोसायटी स्पर्धा'चे निर्देशक निहाय पॉवरपॉईंट सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेच्या निकषांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत उपायुक्त अतुल पाटील यांनी विविध उदाहरणांद्वारे माहिती दिली.

 बैठकीच्या अखेरच्या सत्रात महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या, रस्ते सफाई, जीव्हीपी निर्मुलन, प्लास्टिक बंदी, दैनंदिन कचरा संकलन आणि शहर स्वच्छता यावर सोसायटी पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उपायुक्त अतुल पाटील यांनी महापलिकाद्वारे राबविण्यात येणाऱ्या सुधारणात्मक कार्यवाहीसह ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'ची भूमिका विषद केली.

काही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गृहनिर्माण सोसायटी मध्ये राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि प्रकल्पांविषयी माहिती दिली. ‘कचरामुक्त तारांकित सोसायटी स्पर्धा'मध्ये सहभागी सोसायटींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये मध्ये उत्कृष्ट सोसायट्यांना रोख पुरस्कार, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविले जाणार आहे.

सदर बैठकीस महापालिका अधिकारी उमेश यमगर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे शहर समन्वयक युवराज झुरंगे तसेच इतर कर्मचारी वर्ग आणि ३५ गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव, सभासद उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मार्च महिन्यात हापूस आंबा निर्यातीला सुरुवात