मार्च महिन्यात हापूस आंबा निर्यातीला सुरुवात

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली आहे.त्यामुळे  परदेशात हापूस आंबा निर्यातीला सुरुवात झाली आहे. मात्र, हापूस आंब्याचा मुख्य हंगाम अद्याप सुरु झालेला नाही. त्यामुळे येत्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढताच निर्यातीचा वेग वाढणार असून, रमझान निमित्त हापूस आंबा मागणीत देखील वाढ होणार आहे.

हापूस आंब्याची चव सर्वांनाच आवडते. भारतीयांप्रमाणे परदेशी नागरिकांना देखील हापूस आंब्याच्या चवीने भुरळ घातली आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला परदेशात मागणी वाढत आहे. यंदा हापूस आंब्याच्या मुख्य हंगामाला अजून सुरुवात झाली नसली तरी बाजारात दिवसेंदिवस हापूस आंब्याची आवक वाढत चालली आहे. सध्या एपीएमसी बाजारात १३ हजारच्या घरात हापूस आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. २६ फेब्रुवारी रोजी एपीएमसी बाजारात ६७१७ तर परराज्यातील ६३४७  मिळून एकूण १३ हजार ६४ हापूस आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात हापूस आंबा दाखल होत असल्याने परदेशात देखील हापूस आंब्याला मागणी वाढू लागली आहे. त्यानुसार हापूस आंब्यावर प्रकिया करुन युरोप आणि  आखाती देशात हवाई आणि सागरी मार्गे हापूस आंबा निर्यात केला जात आहे. सध्या आखाती देशात हापूस आंबा निर्यात होत असून, येत्या १२ मार्च पासून रमजान महिना सुरु होणार आहे. त्यामुळे आखाती देशात हापूस आंब्याच्या मागणीत सरासरी  पेक्षा अधिक वाढ होणार असल्याची शक्यता आहे. तर आता आवक होत असलेल्या हापूस आंब्यापैकी १० ते१५ %आंबा निर्यात होत आहे, अशी माहिती एपीएमसी मार्केट मधील आंबा विक्रेत्यांनी दिली.
परदेशात पाठवण्यात येणाऱ्या हापूस आंब्याला अनेक कसोटीतून जावे लागते. कोकणातील हापूस आंबे या कसोटीत खरे उतरतात. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला परदेशात अधिक मागणी असते. मात्र, वातावरणात अजून गारवा असल्याने हापूस आंब्याची वाढ हवी तशी होत नाही. त्यामुळे आता मार्च महिन्यातील उन्हामुळे हापूस आंब्याची वाढ चांगली होणार असून, एपीएमसी बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक देखील वाढणार आहे. आवक वाढताच परदेशात हापूस आंब्याच्या निर्यातीला सुरुवात होणार आहे. - मोहन डोंगरे, फळ विक्रेते आणि निर्यातदार -एपीएमसी मार्केट, वाशी. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई-उरण एनएमएमटी बस सेवा बंद; प्रवाशांसह विद्यार्थ्याचे हाल