गौण खनिज उत्खननाकडे तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष?

वाशी : नवी मुंबई शहरात नवीन इमारतींच्या बांधकामांसाठी खोदकामे सुरु आहेत. या खोदकामांच्या उत्खननाकरीता तहसील कार्यालय मधून रितसर रॉयल्टी भरुन अटी-शर्तीच्या अधिन राहून परवानगी दिली जाते. मात्र, सदर परवानगी दिल्यानंतर उत्खननाकडे मंडळ अधिकारी दुर्लक्ष करीत असून, उत्खननाची रितसर माहिती देण्यात टाळाटाळ करीत असल्याचे समोर येत आहे.

नवी मुंबई शहरातील शहरी भागात  पुनर्विकास कामांनी तर औद्योगिक वसाहतीत, एमआयडीसी भागात नवीन बांधकामांनी जोर पकडला आहे. या बांधकामांसाठी उत्खनन करण्याकरिता तहसील कार्यालयातून प्रती ब्रास ६०० रुपये रॉयल्टी भरुन परवानगी दिली जाते. मोठ्या भूखंडावर गौण खनिज उत्खननाची परवानगी  टप्याटप्प्याने वाढवली जाते. गौण खनिज उत्खनन परवानगी देताना तब्बल २४ अटी घातल्या जातात. मात्र, विकासकांकडून या अटी-शर्तींचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे समोर येत आहे. या साऱ्या  प्रकाराकडे तहसील विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण याबाबत मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करुन देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

वाशी मधील पुनर्विकास कामांना तहसील कार्यालयातून उत्खनन परवानगी देण्यात आल्या आहेत. मात्र, गौण खनिज उत्खनन परवानगी घेतलेल्या व्यवतींनी परवानगीच्या अधिन राहून किती उत्खनन केले याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन माहिती घेतली जाणार असून, अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असेल तर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. - सुरेश रोकडे, बेलापूर मंडळ अधिकारी - ठाणे तहसील .

महापे एमआयडीसी मधील नवीन इमारत खोदकामासाठी प्राथमिक  उत्खनन परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सदर परवानगीचे वाढत्या उत्खनन नुसार किती वेळा नूतनीकरण केले, याची पाहणी करुन माहिती देण्यात येईल. - ननरुटे, दहिसर मंडळ अधिकारी - ठाणे तहसील. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वुमन्स वॉकेथॉनला ऐरोलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद