वाशीमध्ये ‘ठाणे जिल्हा ग्रंथोत्सव' सुरु

नवी मुंबई : वाचनयुक्ती चळवळ लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाचे ग्रंथोत्सव कार्यक्रम उपयुक्त आहेत, असे मत प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.

‘ठाणे जिल्हा ग्रंथोत्सव'चे उद्‌घाटन साहित्य अकादमी सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत ग्रंथालय संचालनालय-जिल्हा ग्रंथालय, अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य मंदिर सभागृह, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय, वाशी येथे ‘ग्रंथोत्सव'चे आयोजन करण्यात आले. ‘ग्रंथोत्सव'च्या उद्‌घाटनापूर्वी वाशी शहरात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथदिंडीला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी मुंबई विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय, साहित्य मंदिर-वाशीचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, ‘साहित्य परिषद'चे उपाध्यक्ष तथा प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे, जिल्हा ग्रंथालय ठाण्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील आणि नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने ‘ग्रंथोत्सव'च्या माध्यमातून एक मोहीम राबविली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नवीन पिढी घडत आहे. ज्याप्रमाणे व्यसनाधीन लोकांचे व्यसन सोडविण्यासाठी शासन व्यसनमुक्तीची मोहिम राबविते त्याचप्रमाणे शासनाने नव्या पिढीला पुस्तक वाचनाचे व्यसन लागावे यासाठी ‘ग्रंथोत्सव'ची मोहिम राबविली आहे, असे डॉ. पाठक उद्‌घाटनीय भाषणात म्हणाले.

डॉ. पाठक यांनी पुस्तक वाचनाचे सामान्य माणसाच्या जीवनातील महत्त्व कसे आहे ते प्रसिध्द कवी दासू वैद्य यांच्या एका कवितेच्या माध्यमातून सांगितले.
प्रास्ताविकामधे जिल्हा ग्रंथालय अधिकारी  प्रशांत पाटील यांनी ‘ग्रंथोत्सव'चे महत्त्व सांगून माणसाची विचारधारा वाचनातून निर्माण होत असल्याबाबत विविध विचारवंतांची उदाहरणे सांगितली. यानंतर ‘साहित्य परिषद'चे उपाध्यक्ष तथा प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे यांनी वाचनाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. ते म्हणाले, भारतात महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे ज्या राज्यात ग्रंथोत्सावासारखा दोन दिवस चालणार कार्यक्रम उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.  म्हात्रे यांनी यावेळी आपल्या कवितेच्या माध्यमातून उपस्थितांना वाचनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आभार सुभाष कुळकर्णी यांनी मानले.

दरम्यान, ‘ग्रंथोत्सव'च्या ठिकाणी विविध विषयावरील अशा असंख्य पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. नागरिकांसह विद्यार्थांनी या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बालाजी मंदिर भूखंड सीआरझेड परवानगीला आक्षेप