लोके हत्या प्रकरणात ३ आरोपी अटकेत  

नवी मुंबई : मानखुर्दच्या कारशेड मधील माथाडी साईट मिळविण्याच्या वादातून चिराग महेश लोके (३०) या गुंडाची हत्या करुन फरार झालेल्या हल्लेखोरांपैकी आणखी २ आरोपींना नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता ३ झाली आहे. दरम्यान, लोके हत्या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईसह इतर भागात पसरल्याने तसेच यात काही संघटीत टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने सदर हत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

 नेरुळ, सेक्टर-२० मध्ये राहणारा चिराग लोके आणि हत्या करणारा आरोपी अरविंद सोडा या दोघांमध्ये मानखुर्दच्या कारशेड मधील माथाडी साईटचे काम मिळविण्यावरुन मागील काही महिन्यांपासून वाद सुरु होता. चिरागने सदरचे काम सोडावे यासाठी त्याला धमकावण्यात देखील आले होते. याच वादातून १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अरविंद सोडा आणि त्याचे साथीदार अरबाज, पगला, शेरा आणि इतर ५ ते ६ हल्लेखोरांनी चिराग आणि त्याच्या पत्नीवर लोखंडी रॉड तसेच इतर हत्याराच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला.

 या हल्ल्यात चिरागचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी अरविंद सोडा याच्यासह ५ ते ६ हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रथम मुंब्रा येथून अरबाज जयासुद्दीन शेख (२५) याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सानपाडा येथून दिपक सुरेश खरटमल (२८) याला तसेच उमेश जंजाळ उर्फ गावठी (३२) या दोघांना अटक केली आहे. यातील अरबाज शेख याला न्यायालयाने २२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.  

गवळी गँगशी संबंधित असलेला चिराग लोके आणि छोटा राजन गँगशी संबंधित असलेला अरविंद सोडा दोघेही वेगवेगळ्या गुन्ह्यात एकाच जेलमध्ये असताना, त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून मानखुर्द येथील कारशेडच्या कामात लेबर सप्लाय आणि मटेरियल सप्लाय करण्यावरुन वाद सुरु होता. सीवूड्‌स येथील र्ग्डँ सेंट्रल मॉलमध्ये लेबर सपलाय करण्यावरुन देखील त्यांच्यामध्ये वाद सुरु होता. याच वादातून अरविंद सोडा आणि त्याच्या साथिदारांनी चिराग लोके याची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. लोके हत्या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईसह इतर भागात पसरल्याने तसेच या प्रकरणात काही संघटीत टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने सदर हत्या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.  

चिराग लोके याच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-१ कडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार लोके हत्या प्रकरणातील आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहेत. - तानाजी भगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - नेरुळ पोलीस ठाणे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऐरोली सेक्टर-1 मधुन दिड लाखांचा गुटख्याचा साठा जप्त