अवैध गोदामांमुळे औद्योगिक वसाहत आगीच्या ज्वाळांवर?

वाशी : नवी मुंबई मधील औद्योगिक वसाहतीत काही भंगार माफियांनी अतिक्रमणे करुन गोदामे थाटली आहेत. मात्र, या गोदामात भंगार साहित्यासह रासायनिक पदार्थ देखील हाताळले जात असल्याने भविष्यात आगीची मोठी घटना घडल्यास येथील कारखान्यांसह नागरी वस्तीला देखील मोठा धोका आहे. १६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास तुर्भे एमआयडीसीतील एका भंगार गोदामाला आग लागली. मात्र, स्थानिक नागरिक आणि अग्निशन दलाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे नवी मुंबईतील भंगार गोदामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तुर्भे एमआयडीसी मधील सी-१२४ या कंपनीवर बँकेची जप्ती असून, ती कंपनी सध्या बंद आहे. मात्र, सदर कंपनी बंद असल्याचा फायदा घेत राजकीय आशीर्वादाने या कंपनी आवारात भंगार गोदाम  वसले आहे, अशी माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली.

दिघा पासून शिरवणे पर्यंत ‘एमआयडीसी'च्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण करुन काही बंद कंपन्यांमध्ये भंगार माफीयांकडून  खरेदी- विक्री दुकाने आणि गोदामे थाटण्यात आली आहेत.भंगार माफियांकडून नवी मुंबईतील एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांमधील घातक रसायन, रसायन भरलेले ड्रम, ज्वलनशील वस्तूंचा साठा गोदामांमध्ये केला जातो.औद्योगिक वसाहतीमधील बंद कंपन्यांमधील चोरीचा माल तसेच घातक आणि ज्वलनशील रासायनांचे ड्रम, थर्माकोल, प्लास्टिक सारख्या ज्वलनशील वस्तूंचा साठा केला जात असल्याने आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. त्यामुळे अवैध गोदामांमुळे आज नवी मुंबईतील औद्योगिक वसाहत आगीच्या  ज्वाळांवर उभी आहे. मात्र, आगीच्या घटना घडल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने भंगार माफियांचा आत्मविश्वास वाढला आहे. भंगार गोदामांना लागणाऱ्या आगींच्या घटनांमुळे टीटीसी औद्योगिक भागातील गोदामलगतच्या रहिवासी वस्तीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एमआयडीसी मधील भंगार गोदामांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

नवी मुंबईतील एमआयडीसी मधील मोकळ्या जागांवर अतिक्रमण करुन तर काही बंद कंपन्यांमध्ये  भंगार माफियांनी स्वतःचे बस्तान बसवले आहे. तुर्भे एमआयडीसी मधील सी-१२४ या गोदामामध्ये भंगार साहित्यासह गायी-म्हशी देखील होत्या. मात्र, आग लागताच स्थानिकांनी धाव घेतल्याने या प्राण्यांचे जीव वाचले. परंतु, प्रशासनाने भांगर माफियांना जर आश्रय दिला तर भविष्यात आगीची मोठी घटना घडून नागरी वस्ती जळून शेकडो जणांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे अवैध भंगार गोदामांवर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. - महेश कोटीवाले, नवी मुंबई शिवसेना उप शहरप्रमुख (उबाठा). 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कर संकलनाच्या तुलनेत किमान सेवा-सुविधा मिळाव्यात