अखेर वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुरुस्ती पूर्ण

तुर्भे : नवी मुंबई महापालिका शहर अभियंता विभागाकडून  अखेर वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्र शिल्पाची वास्तू काही ठिकाणी तुटली होती.

नवी मुंबई शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तसेच नवी मुंबई शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी येथील बस डेपो लगत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील शिल्प बसविण्यात आली आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून २४ तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. तसेच या ठिकाणी अनेक आंदोलने, चौक सभा, निदर्शने केली जातात. यासाठी ‘एमटीएनएल'च्या लगत खुला प्रदर्शन मंच उभारण्यात आला आहे. या प्रदर्शन मंचाच्या वरील बाजूस किल्ल्याच्या नक्षीची साईड पट्टी लावण्यात आली आहे. सदर नक्षीची साईड पट्टी अनेक ठिकाणी तुटलेल्या स्थितीमध्ये होती. याशिवाय खुला प्रदर्शन मंच आणि जीवन शिल्प या ठिकाणची विद्युत रोषणाई केलेले हॅलोजन, एलईडी पट्टा लाईट देखील ठिकठिकाणी तुटलेले होते. या प्रकरणी अभियंता विभागाच्या निदर्शनास सदर बाब आल्यावर त्यांनी त्वरित दुरुस्ती केली आहे. तसेच चौकातील कारंजांना किल्ल्याच्या नक्षीचे संरक्षक (पडदी) भिंत करण्यात आली आहे. सदर भिंत देखील वाहनांनी धडक दिल्याने अनेक ठिकाणी तुटली होती. याची देखील दुरुस्ती करुन घेण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची दिनांकानुसार जयंती उद्या १९ फेब्रुवारी रोजी असल्याने या ठिकाणी रंगरंगोटीही करण्यात आल्याने सध्या या चौकाचे रूप पालटले आहे. शिवजयंती दिननिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात येणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावणे एमआयडीसी मधील रसायन कंपनीला भीषण आग