पावणे एमआयडीसी मधील रसायन कंपनीला भीषण आग

वाशी : नवी मुंबई शहरातील पावणे एमआयडीसी मधील सुझान केमिकल या रसायन कंपनीला १७ फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत सायंकाळ पर्यंत कोणीही जखमी किंवा मृत झाले नसल्याची प्राथमिक माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

पावणे एमआयडीसी मधील सुझान केमिकल या कंपनी मध्ये रसायन बनवण्याचे काम होत असून, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली. आगीची घटना समजताच एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सदर कंपनी रसायनची असल्याने आगीने थोड्याच वेळात भीषण रुप धारण केल्याने शेजारील दोन कंपन्याना या आगीची झळ बसली. आग विझवण्यासाठी खैरणे, तुर्भे, रबाळे एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या एकूण १२ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन साडेतीन ते चार तासात आग विझविली. या आगीत  कुणीही जखमी किंवा मृत झाले नसल्याची प्राथमिक माहिती  एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, मागील महिन्यात सुझान केमिकल कंपनी शेजारील मेहेक केमिकल कंपनीला भीषण आग लागून कंपनी जळून खाक झाली होती.त्यामुळे एमआयडीसी मधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तुर्भे एमआयडीसी मधील भंगार गोदामाला आग
तुर्भे एमआयडीसी मधील गणपती पाडा  येथील सी १२४ या भूखंडावरील एका भंगार गोदामाला १६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची घटना समजताच एमआयडीसी तुर्भे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.सदर आग शॉर्टसर्कटि मुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त  केला जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे येथे ‘गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन'ला सुरुवात