पुस्तकांमध्ये दीर्घकाळ टिकणारे वैचारिक साहित्य -मुख्य सचिव डॉ. करीर

ठाणे ः इंटरनेट जरी सर्वांसाठी खुले असले तरी त्याचा वापर क्षणिक असतो, तर वाचन क्षणिक नसते. पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारे वैचारिक साहित्य दीर्घकाळ टिकणारे असते. सामाजिक जीवनात वावरत असताना पुस्तके आणि वाचन खूप महत्वाचे आहे. पुस्तकांमधून आपण केवळ शिकतो किंवा आपले मनोरंजन होतेच असे नाही तर आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि तो महत्वाचा असल्याचे मत राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले.

ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित ‘विचारमंथन' व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित ‘वाचन आणि मी' या विषयावरील १३ वे पुष्प १४ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी गुंफले. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्य सचिव   डॉ. नितीन करीर हे होते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यवरांचे ग्रंथबुके आणि चित्रप्रतिमा देवून स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते.

पुस्तकाचे वाचन सैरभैर असायला हवे, ते एकांगी असू शकत नाही. अवांतर वाचनाचे महत्व सर्वांनी जाणून घ्यायला हवे. कुठल्याही कलेचा आनंद मग संगीत असो की वाचन ते अवांतर असायला हवे. पुस्तकांचे वेगवेगळे जॉनर आहेत, यापैकी कुठलेतरी एक जॉनर आपल्याशी बोलत असते. कुठल्या प्रकारची पुस्तके आपल्याशी बोलतात आणि पुस्तकांचा प्रवासच इतका छान असतो आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुस्तके सतत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतात फक्त आपली ऐकण्याची तयारी असली पाहिजे, असेही डॉ. नितीन करीर यांनी नमूद केले.

आटपाडीमध्ये मी शिकत असताना वाचनाला फार अनुकूल परिस्थिती नव्हती. शाळेत वाचनालय नव्हते. मात्र, घरामध्ये वाचनाचे वातावरण होते. कळत्या वयापासून मी महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्र वाचत आहे. तसेच माझ्या आजीला संध्याकाळी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचून दाखवायचो. त्यामुळे वाचनाची सवय होती. पण, खऱ्या अर्थाने ज्योत्स्ना प्रकाशनाच्या ‘इट्टू पिट्टू' या सारख्या गोष्टीतून वाचनाला सुरुवात झाली असल्याचे ‘वाचन आणि मी' यावर बोलताना ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी सांगितले.
शाळेतील कथाकथन स्पर्धेसाठी जाताना आजीने सांगितलेली खुदीराम बोस यांची गोष्ट सांगितली आणि ती जेवढी गोष्ट ऐकली तेवढी शाळेत जावून सांगितली. विशेष म्हणजे मला पहिल्या क्रमाकांचे पारितोषिक मिळाले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने घरातून वाचनाला सुरुवात झाली. त्यावेळेस वर्तमानपत्राव्यतिरिक्त दुसरे काही वाचण्याचे साधन नव्हते. तेव्हा १५-२० दिवाळी अंक एकेकजण करुन वाचत असल्याचे खांडेकर यांनी नमूद केले. आटपाडीमध्ये वाचनालय सुरु झाल्यानंतर वाचनाचा ओढा वाढला. सुरुवातीला जादूच्या गोष्टींची पुस्तके वाचल्यानंतर सुहास शिरवळकर, व.पु. यांची पुस्तके वाचण्यास सुरुवात झाली. चोखंदळ वाचक जसा असतो तसा मी तेव्हाही नव्हतो आणि आताही नाही. संदर्भ जोडणे आता कामाचा भाग  झाला असल्यामुळे संदर्भ शोधण्यासाठी वाचलेली पुस्तके आनंद देवून जात असल्याचेही खांडेकर यांनी नमूद केले.

महापालिकेचा उपक्रम स्तुत्य...
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना मुक्तपणे पुस्तके हाताळण्यास संधी मिळावी यासाठी महापालिकेच्या शाळेत सुरू केलेला ‘वाचन कोपरा' अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. शाळेच्या मुलांसाठी सदर उपक्रम सुरू केल्याबद्दल मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे कौतुक केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखेर वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुरुस्ती पूर्ण