थकीत कर वसुलीसाठी मालमत्तांचा लिलाव

पनवेल : महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांच्या विरोधात पनवेल महापालिकेने कारवाईच्या दिशेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार महापालिका थकबाकीदारांच्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता अटकावणी करुन त्याची जाहिर लिलावाने विक्री करुन थकबाकी वसूल करणार आहे. त्यासाठी महापालिकेने १६ फेब्रुवारी रोजी विविध वृत्तपत्रांंमध्ये थकबाकीदारांची यादी प्रसिध्द केली आहे. यामध्ये यामध्ये औद्योगिक, निवासी, व्यावसायिक यांच्या नावाचा समावेश आहे.

महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागामधील सुमारे ३.५० लाख मालमत्तांना कराची आकारणी करण्यात आली आहे.  यातील ७७ हजार मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ताकर भरला आहे. उर्वरित २.८० लाख मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरला नाही. १६ फेब्रुवारी २०२४ अखेर एकूण ५४२.७३ कोटी रुपयांची वसुली महापालिकेने केली आहे. तसेच सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये १७ एप्रिल पासून आजपर्यंत २५५ कोटी रुपये इतकी वसुली झाली आहे.

आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु, आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांचा खूप जास्त मालमत्ता कर भरावयाचा राहीला अशा सुमारे १०१ औद्योगिक, १०७ अनिवासी, १०० निवासी थकबाकीदारांची यादी वृत्तपत्रांतून प्रसिध्द केली आहे.

मालमत्ता धारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेने सातत्याने विविध सवलती दिल्या होत्या. अखेर मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने मालमत्ताधारकांना वसुलीच्या नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या चारही प्रभागामधील, सिडको नोडमध्ये विविध टीमच्या माध्यमातून वसुली नोटीस देण्यात आहे. आता महापालिका थकबाकीदारांच्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता अटकावणी करुन त्याची जाहिर लिलावाने विक्री करुन थकबाकी वसूल करणार आहे. त्यासाठी थकीत मालमत्ता कराच्या कारवाई अंतर्गत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर मालमत्ता विक्री आणि खरेदीस प्रतिबंध असल्याने विक्री खरेदी व्यवहार करता येणार नाही, अशा आशयाचे महापालिकेने विशेष स्टीकर्स छापले आहेत. जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांवर  सदर विशेष स्टीकर्स लावले जात आहे.

महापालिका महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन सातत्याने रिक्षामधून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून चारही प्रभागांमध्ये केले जात आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी  ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच .www. panvelmc.org  या वेबसाईटवर जाऊन आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम १२८ आणि अनुसूची ड-प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये महापालिकेला देय असलेल्या कराच्या थकबाकी पोटी जंगम स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करुन जाहिर लिलावाने विक्री करुन थकबाकी वसूल करणेची तरतूद महापालिकेला आहे.
-गणेश देशमुख, आयुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पुस्तकांमध्ये दीर्घकाळ टिकणारे वैचारिक साहित्य -मुख्य सचिव डॉ. करीर