अपघातविरहीत सेवेसाठी एनएमएमटी बस चालकांचे प्रबोधन  

नवी मुंबई : एनएमएमटी बसच्या अपघातांमध्ये वाढ होत असल्याने ‘एनएमएमटी'मधील बस चालकांमध्ये वाहतुकीच्या नियंमाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या घणसोली आगारात विशेष कार्यक्रमाचे १४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, ‘नवी मुंबई'च्या उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी एनएमएमटी बस चालकांना रस्ते अपघात, वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करुन त्यांचे प्रबोधन केले.  

८ फेब्रुवारी रोजी उरणमध्ये एनएमएमटी बसमुळे झालेल्या अपघातात एका दुचाकी चालकाचा मृत्यू तसेच एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघातानंतर संतप्त जमावाने एनएमएमटी बसची तोडफोड केली होती. एकंदरीतच गेल्या काही महिन्यांमध्ये एनएमएमटी बसच्या अपघातात वाढ होऊ लागल्याने अपघात कमी व्हावेत, यासाठी ‘एनएमएमटी'चे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी पुढाकार घेतला आहे. ‘रस्ता सुरक्षा अभियान-२०२४'च्या अनुषंगाने योगेश कडुस्कर यांनी घणसोली आगारात परिवहन उपक्रमातील बस चालकांसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  

यावेळी नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी बस चालकांना मार्गदर्शन करताना, वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी, अपघातापासून जनतेचा आणि आपल्या स्वतचा कसा बचाव करावा, वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन बसमध्ये असलेल्या प्रवाशांना सुरक्षित आणि इच्छित स्थळी कसे पोहोचवता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तर ‘नवी मुंबई'च्या डेप्युटी आरटीओ हेमांगिनी पाटील यांनी आरटीओ विभागाने घालून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन केले तर अपघात होणारच नाहीत याविषयी बस चालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

 यावेळी ‘एनएमएमटी'चे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी देखील रस्ते अपघात होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत बस चालकांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व चालक नियमांचे तंतोतंत पालन करतील अशी उपस्थित मान्यवरांना ग्वाही दिली. सदर कार्यक्रमास कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे, महापालिका परिवहन उपक्रमातील अधिकारी तसेच ‘एनएमएमटी'तील सुमारे २०० चालक उपस्थित होते. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

डॉक्टरला हॉटेलमध्ये डांबून उकळली ३० लाखांची खंडणी