रस्ता दुभाजकांतील झाडांचा पाणी पुरवठा खंडित

वाशी : नवी मुंबई महापालिका तर्फे नवी मुंबई शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांत शोभेची तसेच इतर झाडे लावण्यात आली आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून रस्त्यांच्या दुभाजकांतील झाडांचे पाणी महापालिका पाणी पुरवठा विभागाने खंडित केल्याने रस्त्यांच्या दुभाजकांतील शोभेची झाडे कोमेजली असून, त्यापैकी असंख्य झाडे मरणाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या या भोंगळ कारभाराबद्दल पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महापालिका द्वारे नवी मुंबई शहरातील वृक्ष संपदा वाढविण्यासाठी नवी मुंबई शहरात माझी वसुंधरा, मियावाकी अंतर्गत तसेच उद्यान विभागामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन इतर महापालिकांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे. तसेच रस्त्यातील दुभाजकांत देखील शोभेची आणि देशी-विदेशी झाडे लावून दुभाजक बहरुन ठेवले आहेत. मात्र, मागील एक ते दीड महिन्यांपासून झाडे लावलेल्या रस्त्यांच्या दुभाजकांतील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात ठाणे-बेलापूर मार्ग, पामबीच मार्गावरील अरेंजा कॉर्नर ते कोपरी पुल यासह एपीएमसी परिसरातील काही रस्ते दुभाजकांचा समावेश आहे. त्यामुळे बहुतांश रस्ते दुभाजकांतील शोभेची झाडे पाण्याअभावी जळून गेली आहेत. तर मोठी झाडे देखील मरणाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या या भोंगळ कारभाराविरोधात पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, रस्त्यांच्या दुभाजकांतील झाडे कोमेजण्याबाबत महापालिका उपायुक्त (उद्यान विभाग) दिलीप नेरकर यांना विचारले असता, ‘पुनर्रप्रकिया (एसटीपी) विभागाचे काही काम सुरु असल्याने या विभागाने पाणी बंद केले आहे', असे त्यांनी सांगितले. तर या संदर्भात महापालिका मलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता  सुधाकर मोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन जरांगेच्या तब्बेतीची काळजी घ्या