ठाणेकरांच्या सेवेत ‘ग्रॅण्ड सेंट्रल पार्क'

ठाणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी ‘ग्रॅण्ड सेंट्रल पार्क'ची संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे. ‘ग्रॅण्ड सेंट्रल पार्क' आबालवृध्दाना आनंद देणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिकेच्या आणि कल्पतरु समुहाने विकसित केलेल्या ‘ग्रॅण्ड सेंट्रल पार्क'चे ८ फेब्रुवारी रोजी लोकार्पण संपन्न झाले.
आमदार संजय केळकर यांनी सुचवल्याप्रमाणे या उद्यानाला, जगभरात ज्यांनी देशाचा नावलौकिक वाढवला आहे, असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात येईल. त्यामुळे या उद्यानाची ओळख ‘नमो द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क' अशी होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण सोहळ्यात जाहीर केले.

 ठाणे महापालिका क्षेत्रात कोलशेत भागात २०.५ एकर जागेवर साकारलेल्या ‘ग्रॅण्ड सेंट्रल पार्क'च्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शालेय शिक्षण-मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, एच. एस. पाटील, मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक संजय वाघुले, संदीप लेले, उषा भोईर, भूषण भोईर, सिध्दार्थ ओवळेकर, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिताली संचेती, ‘कल्पतरु डेव्हलपर्स'चे मोफतराज मुनोत, आदि उपस्थित होते. लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण उद्यानाची पाहणी केली. त्यातील संकल्पनेवर आधारित विविध देशांची उद्याने, लहान मुलांसाठी असलेली खेळणी, जागा यांची पाहणी केली. क्यूआर कोड स्कॅन करुन झाडाविषयी माहितीही जाणून घेतली.

‘ग्रॅण्ड सेंट्रल पार्क' राज्यातील सर्वात मोठे उद्यान आहे. त्याचा उभारणीत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. सुमारे ३५०० झाडे या उद्यानात आहेत. आणखी झाडांचे नियोजन करावे. तसेच त्याचे व्यवस्थापनही नेटकेपणाने व्हावे. ‘कल्पतरु डेव्हल्पर्स'ने टीडीआरच्या माध्यमातून सदर उद्यान उभे केले आहे. महापालिकेचा एकही पैसा खर्च न करता भव्य दिव्य उद्यान उभे राहिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अर्बन फॉरेस्ट कसे असू शकते याचे उद्यान उत्तम उदाहरण आहे. ऑक्सिजन पार्क आहे. कांरजे, तलाव यांचा अनुभव सगळ्यांना घेता येईल. त्याच जोडीने मिनिएचर पार्क उभे करण्यात येणार आहे. त्यात जगभरातील आश्चर्यांच्या मोठ्या प्रतिकृती येथे पाहता येतील. सगळ्यांनाच परदेशात जाता येत नाही. त्यामुळे त्यांनाही तो आनंद या मिनिएचर पार्कमध्ये घेता येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

तर सेंट्रल पार्क भव्य दिव्य झाले असून उत्तम पर्यटन स्थळ होईल, असा विश्वास आ. संजय केळकर यांनी व्यक्त केला. तसेच या उद्यानाचे नामकरण ‘नमो ग्रॅण्ड सेंट्रल पार्क'असे करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

ठाणेमध्ये स्नो पार्क...
 ठाणे मध्ये या सेंट्रल पार्क पाठोपाठ एक स्नो पार्क (बर्फ उद्यान) विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले. स्नो पार्क ठाणेकरांसाठी मेजवानी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ग्रॅण्ड सेंट्रल पार्क-प्रवेशाच्या वेळाः
सकाळी ६ ते ११
सायंकाळी ४ ते रात्री
(सोमवारी बंद)
प्रवेश शुल्कः
लहान मुले (१५ वर्षापर्यंत) - शुल्क नाही
ज्येष्ठ नागरिक - १० रुपये (प्रती दिवस)
प्रौढ - २० रुपये (सोमवार ते शुक्रवार)
प्रौढ -३० रुपये (शनिवार, रविवार, सार्वजनिक सुटी)
सायकल प्रवेश शुल्क - २० रुपये (प्रती दिवस). 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘संकल्प स्वच्छतेचा' अंतर्गत आयुवतांचा अधिकारी-कर्मचारी नागरिकांशी संवाद