मालमत्ता कर भर करण्याकडे वाढला पनवेलकरांचा कल 

पनवेल : यावर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल २०२३ पासून ते ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत २५० कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. महापालिकेत आजवर १० महिन्यामध्ये पहिल्यांदाच एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याचाच सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

मागील वर्षाच्या तूलनेत यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत २५० कोटीहून अधिक रूपयांची भर पडली आहे. मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये दरमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरल्यास त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. ज्या नागरिकांना अजुनही मालमत्ता कराची बिले मिळाली नाही त्यांनी महापालिकेच्या 1800 5320340  या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास कॉल सेंटरच्या माध्यामातून बिल घेता येणार आहे. तसेच मालमत्ता करासंदर्भातील हरकती (नावामध्ये बदल, मालमत्तेचे बाह्य स्वरूपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहिली असल्यास, वापरामधील तफावत असल्यास, स्वमालकी असताना भाडेतत्वावर कर आकारणी झाली असल्यास) मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज संबधित प्रभाग कार्यालयाकडे सादर करावेत.

मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. या ॲपमध्ये नाव बदलाकरिता रिक्वेस्ट केल्यास महापालिकेकडून नाव बदलानंतर संबधितांना नोटिफिकेशन मिळणार आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी महापालिकेने ‘PMC TAX APP’ विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊन आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. या सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा. तसेच मालमत्ताकराबाबत काही शंका असल्यास त्यांनी 1800 5320340 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
-गणेश शेटे, उपायुवत-पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणेकरांच्या सेवेत ‘ग्रॅण्ड सेंट्रल पार्क'