सार्वजनिक वापरासाठी असलेल्या भूखंडावर उद्यानाची उभारणी

नवी मुंबई : तुर्भे गावातील तलाव परिसराची सुधारणा आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली ग्रामस्थांच्या सार्वजनिक वापरासाठी असलेल्या भूखंडावर उद्यान निर्माण करण्याच्या महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला तुर्भे ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णया विरोधात ‘श्री मांढरदेवी काळुबाई सेवाभावी सामाजिक संस्था'चे अध्यक्ष सुनील पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

तुर्भे गावातील तलाव परिसराची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्याचा कामाला महापालिका आयुक्तांनी २० ऑक्टोबर २०२३ मंजुरी दिली आहे. त्यानुसार तलाव परिसरात असलेल्या मोकळ्या भूखंडावर उद्यान उभारण्याची निविदा शहर अभियंता विभागाने प्रसिध्द केली. त्याला तुर्भे गावातील ३५० स्थानिक ग्रामस्थांनी लेखी हरकती घेतल्या आहेत. महापालिका प्रशासनाने ज्या भूखंडावर उद्यान उभारण्याचा घाट घातला आहे. सदर भूखंडावर उद्यान उभारण्याला ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे. गावातील ग्रामस्थांच्या घराजवळ मोकळी जागा नसल्याने सदर भूखंडाचा वापर हळदी समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, दशक्रिया यासह इतर धार्मिक विधी आणि कार्यक्रमांसाी केला जातो.

परंतु, महापालिका अधिकाऱ्यांनी टक्केवारी साठी टेंडर काढून काम सुरु केले आहे. तुर्भे गावात उद्यान तयार करण्यासाठी सिडको आणि महापालिकेचे २० ते ३० भूखंड मोकळे आहेत. त्याठिकाणी महापालिकेने उद्यान उभे करावे, अशी विनंती ‘श्री मांढरदेवी काळुबाई सेवाभावी सामाजिक संस्था'चे अध्यक्ष सुनील पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

सध्या होऊ घातलेल्या सुशोभिकरणाला ‘काँग्रेस ओबीसी सेल'चे प्रदेश सचिव डॉ. विनोद पाटील तसेच ‘युवक काँग्रेस'चे जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय पाटील यांनीही विरोध दर्शवला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कायदा मंजूर होईपर्यंत आमरण उपोषण - मनोज जरांगे