‘खारघर-तुर्भे लिंक रोड' दृष्टीपथात

नवी मंबई : सायन-पनवेल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘खारघर-तुर्भे लिंक रोड (केटीएलआर)' प्रकल्पाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती येणार आहे. अंदाजे २,१०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम त्रत्विक प्रोजेवटस्‌ एव्हरास्कॉन (जेव्ही) भागीदारीतून करणार आहे. या कंपनीला नुकतेच २ जानेवारी २०२४ रोजी सदर कामाचे कार्यादेश ‘सिडको'तर्फे देण्यात आले आहेत.

दरम्यान, ‘खारघर-तुर्भे लिंक रोड'साठी पारसिक डोंगराखालून १.७६३ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. तसेच या कामासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या संबंधित कंपनीने प्राप्त करण्याबाबत कामाच्या अटी-शर्तीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कंपनीला पर्यावरण विषयक आणि इतर तत्सम परवानग्या मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते. त्यामुळे ‘खारघर-तुर्भे लिंक रोड' अंतर्गत कंत्राटदार कंपनी कधी काम सुरु करते? याचीच आता प्रतिक्षा आहे.

सायन-पनवेल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ‘खारघर-तुर्भे लिंक रोड (केटीएलआर)'चा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी'ने तयार केला आहे. ५.४९० कि.मी. लांबीच्या या प्रकल्पासाठी अंदाजे २,१०० कोटी रुपये खर्च येणार असून शासनाने नोडल एजन्सी म्हणून ‘सिडको'ची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘खारघर-तुर्भे लिंक रोड'साठी खारघर डोंगरातून भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या लिंक रोडमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहनांना आता सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर ऐवजी खारघर मार्गे प्रवास करता येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका हद्दीतील ठाणे-बेलापूर रोड, पामबीच मार्ग आणि सायन-पनवेल महामार्ग या प्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी होऊन वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. मुंबई अथवा ठाणे येथून खारघर केवळ अर्धा तासात गाठणे शवय होणार आहे.परिणामी, खारघर-तळोजा नोड नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, एपीएमसी, नेरुळ या नोडशी जवळ येणार आहेत.

सायन-पनवेल महामार्गावरुन दिवसाला किमान २ लाखांपेक्षा जास्त वाहने प्रवास करीत आहेत. या महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. यात दुचाकी वाहनचालकांचा बळी जाण्याची घटना जास्त घडत असल्याचे दिसून आले आहे. तसेच दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात वळविण्यात यावी म्हणून ‘एमएसआरडीसी'ने तुर्भे एमआयडीसी ते खारघर असा ६ किलोमीटर लांबीचा रस्ता, पारसिक डोंगर पोखरुन थेट खारघर येथील ८० हेक्टर जागेवर निर्माण करण्यात येणाऱ्या ‘सिडको'च्या आंतरराष्ट्रीय खारघर कॉर्पोरेट पार्कला जोडण्यात येणार आहे. ‘खारघर-तुर्भे लिंक रोड'साठी अंदाजे २,१०० कोटी खर्च केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ‘सिडको'कडून सदर प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

खारघर-तुर्भे लिंक रोड वैशिष्ट्येः
-खारघर-तुर्भे लिंक रोडचा उगम जुईनगर रेल्वे स्थानकासमोर सायन-पनवेल महामार्गापासून होऊन खारघर येथील गुरुद्वारा तथा ‘सेंट्रल पार्क'च्या चौकापुढे अस्तित्वात असलेल्या ३० मीटर रुंंदीच्या रस्त्यामध्ये लिंक रोड विलीन होणार.
- मार्गिकेची एकूण लांबी ५.४९० कि.मी.
- खारघर डोंगर फोडून निर्माण केल्या जाणाऱ्या भुयारी मार्गाची लांबी १.७६३ कि.मी. आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये सिडको द्वारे कारवाई