‘महाराष्ट्र भवन'चा मार्ग प्रशस्त

नवी मुंबई : ‘नवी मुंबई'मध्ये ‘महाराष्ट्र भवन' व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासून ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने मुहर्तस्वरूप प्राप्त झाले आहे. यासंदर्भात ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक पार पडली.

सदर बैठकीत वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भवन'च्या भव्यदिव्य वास्तू उभारणीचे अंतरीम सादरीकरण करण्यात आले. तसेच ‘महाराष्ट्र भवन'ची वास्तू कशी असेल? ते मी प्रत्यक्ष पाहून माझ्या आनंद झाला. ‘महाराष्ट्र भवन'ची वास्तू बघितल्यावर खरेच देशात अशी एकमेव वास्तू नवी मुंबई मध्ये लवकरच आकाराला येणार असल्याच्या बाबीवर विश्वासच बसत नाही, अशी भावना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यवत केली आहे.

‘महाराष्ट्र भवन'ची प्रस्तावित वास्तू १४ मजल्यांची असून यामध्ये अभ्यागतांसाठी स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, भोजन कक्ष, प्रीफेशनल एरिया, बँक्वेट हॉल, सुट रुम, ज्युस कॅफे, टी-कॅफे, कॉफी-कॅफ, बैठक कक्ष, ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, फुड प्लाझा विश्रांती कक्ष, व्ही.आय.पी. रुम तसेच लोकप्रतिनिधींसोबत येणारे त्यांचे सारथी, सहकारी, वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता विश्रांती रुम असणार आहेत. यासह विविध प्रकारच्या सुसज्ज सुख-सुविधांची रेलचेल ‘महाराष्ट्र भवन'मध्ये पहावयास मिळणार आहेत. ‘महाराष्ट्र भवन'च्या प्रथम दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेऊनच महाराष्ट्राची आठवण संबंधितांना करुन दिली जाणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

दरम्यान, ‘महाराष्ट्र भवन'चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे भविष्यात प्रथमच वेगळीच वास्तू महाराष्ट्रामध्ये उभी राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ‘सिडको' व्यवस्थापकीय संचालक आणि अधिकारी यांचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आभार मानले आहेत. 

नवी मुंबई शहर वसवितांना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी विविध राज्यांना भूखंड उपलब्ध करुन दिले गेले. राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने वाशी येथे उभी राहिली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, आदि विविध ठिकाणाहून नागरिक मंत्रालयीनकामांसाठी, विविध स्पर्धा परीक्षा, नोकर भरती, आदि बाबींसाठी मुंबईत येत असतात. मात्र, जागा नसल्याने आणि हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या ‘महाराष्ट्र भवन'साठी सन २०१४ पासून माझा जो लढा चालला होता, त्याला आत पूर्णविराम मिळाला आहे.  ‘महाराष्ट्र भवन'चा फायदा नवी मुंबईलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांना होणार आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण विभागातील सर्व महसूल कार्यालयात ई-ऑफीस प्रणाली शंभर टक्के कार्यरत