ठाणे, उथळसर विभागात महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम

ठाणे : सर्वंकष स्वच्छता मोहिम ३ फेब्रुवारी रोजी ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आली. या मोहिमेत रस्ते सफाईबरोबर सदर परिसरात असलेल्या नाल्यांमधील गाळ काढण्यात आला. दरम्यान, नालेसफाई फक्त पावसाळ्यापूर्वी न करता आतापासूनच नियमित नाल्यातील गाळ काढल्यास पावसाळ्याअगोदर बहुतांश नालेसफाई होईल, असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वंकष स्वच्छता मोहिमेस सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त अभिजीत बांगर, माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेविका दीपा गावंड, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका भवन येथून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम रस्ते झाडून स्वच्छ करणे, त्यानंतर दुभाजक, फुटपाथ स्क्रबरच्या सहाय्याने घासून त्यानंतर पाण्याने रस्ते स्वच्छ करण्यात आले. सर्वंकष स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील रस्त्यांची सफाई जरी होत असली तरी परिसरातील नाल्यांमध्ये अडकलेला गाळ काढणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यानुसार वंदना एसटी डेपो शेजारील, आंबेडकर रोड, आनंदपार्क नाला, ऋतूपार्क येथील नाल्यातील गाळ काढण्यात आला. तसेच चेंबर्सची झाकणे उघडून चेंबरमध्ये अडकलेले प्लास्टीक आणि तत्सम कचरा काढण्यात आला.

सर्वंकष स्वच्छता मोहिमेत टेंभीनाका परिसरातील चिंतामणी चौक, गणेश टॉकीज, आंबेकडकर रोड, विकास पाम, लॉरी स्टॅड, सिव्हील हॉस्पिटल सर्कल, खोपट सिग्न्ल, मखमली तलाव परिसर, नूरी बाबा दर्गा रोड, उथळसर नाका, सेंट्रल मैदान, शासकीय विश्रामगृह ते कळवा सर्कल, जेल तलाव ते एनकेटी नाका, कोर्टनाका परिसर, पोलीस कमिशनर ऑफिस ते कळवा खाडी, पोलीस लाईन, कडवा गल्ली, पलॉवर व्हॅली परिसरातील कॅडबरी सिग्नल ते दत्तमंदिर, हरिदास नगर परिसर, प्रताप टॉकीज, कोलबाड जागमाता मंदिर, सावरकर मैदान, मीनाताई ठाकरे चौक परिसरातील गोकुळनगर, माजिवडा ब्रीज खालील परिसर, वृंदावन बस स्थानक, वृंदावन परिसर, गोल्डन डाईज नाका, केव्हीला नाका, राबोडी येथील तबेला रोड, कत्तलखाना, ट्रॅफीक पोलीस चौकी, राबोडी परिसरातील आकाशगंगा रोड, संतोषीमाता आतील परिसर, महालक्ष्मी रोड पंपींग हाऊस साकेत, कळवा सर्कल ब्रीज ते खाडी ब्रीज, साकेत रोड पंपींग हाऊस, नितीन कंपनी परिसर, वंदना बसस्थानक परिसर, शाहिद उद्यान आदि सर्व परिसरातील रस्ते झाडून ते पाण्याच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आले.

आयुक्तांकडून नाल्याची पाहणी...
वंदना एसटी स्टॅण्ड येथील नाल्याची आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी पाहणी केली. पावसाळ्यात या परिसरात पाणी साचते. या पार्श्वभूमीवर येथील नाल्यातील गाळ नियमित वरचेवर काढला जाईल, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे सिडकोवरील जप्ती टळली