महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
परदेशी पाहुण्यांचे आगमन!
वाशी : नवी मुंबईतील खाडीकिनारी गेल्या काही दिवसांपासून आलेल्या परदेशी पलेमिंगो पक्षांमुळे गुलाबी चादर पाण्यावर तरंगताना दिसू लागली आहे. ऐरोली ते पनवेल पर्यंत पसरलेल्या या खाडीमधील पलेमिंगो पाहण्यासाठी पक्षीप्रेमी देखील गर्दी करु लागले आहेत. या पलेमिंगोंचा मुवकाम मे महिन्याच्या अखेर पर्यंत खाडीकिनारी राहणार आहे. गुजरातच्या कच्छ मध्ये पलेमिंगो पक्षांना यंदा पोषण वातावरण भेटल्याने नवी मुंबई शहरात पलेमिंगो पक्षांचे आगमन उशिराने झाले आहे.
ठाणे-नवी मुंबई-पनवेल अशा विस्तीर्ण भागात पसरलेल्या खाडीकिनाऱ्यावरील वातावरण पलेमिंगो पक्षांसाठी पोषक असल्याने थंडीत मोठ्या संख्येने पलेमिंगोंचेे दर्शन होऊ लागले आहे. नवी मुंबई शहराच्या पश्चिमेला असलेल्या खाडीमध्ये पलेमिंगोची गुलाबी चादर पसरली असल्याने लहान-थोरांची पावले तिकडे वळू लागली आहेत.
जगात ६ जातीचे पलेमिंगो असले तरी नवी मुंबईच्या खाडीमध्ये सध्या लेसर आणि ग्रेटर असे २ जातीचे पलेमिंगो पहायला मिळत आहेत. लेसर जातीचे पलेमिंगो गुजरात मधील कच्छ येथून येतात, तर ग्रेटर जातीचे पलेमिंगो परदेशातील सायबेरिया आणि कझाकिस्तानमधून हजारो किलो मीटरचा प्रवास करुन नवी मुंबईतील खाडीकिनारी स्थलांतरीत होत असतात. परदेशात या काळात थंडीचा मोसम, बर्फवृष्टी होत असल्याने पलेमिंगोंची भारताला पसंती असते.
नवी मुंबईच्या खाडीकिनारी २०६ विविध जातीचे पक्षी वास्तव्यास असल्याने पक्षीप्रेमींसाठी ती एक पर्वणी ठरु लागली आहे. पलेमिंगोंची खाद्य पसंती असलेले शेवाळ, लहान मासे, खेकडे, झिंगा आदि नवी मुंबईच्या खाडीकिनारी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने पलेमिंगोंची पसंती या भागात जास्त आहे. यासाठीच वन विभागाने ठाणे, नवी मुंबई खाडीकिनाऱ्याला पलेमिंगो पक्षी अभयारण्य घोषित केले आहे. नवी मुंबईत साधारण नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये पलेमिंगो पक्षाचे आगमन होत असते. मात्र, यंदा गुजरात राज्यातील कच्छ मध्ये पलेमिंगो पक्षांना पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे तेथील मुक्काम वाढल्याने नवी मुंबई शहरात पलेमिंगांेचे आगमन उशिराने झाले आहे.
दरम्यान, या परदेशी पाहुण्यांचा नवी मुंबईतील मुक्काम आता मे अखेर पर्यंत असणार आहे. त्यामुळे जसे जसे या पलेमिंगोंची संख्या वाढत जाईल तसतसे त्यांच्या रंगात बदल होऊन ते गडद गुलाबी रंगाचे होत जातील, अशी माहिती पक्षीप्रेमी तथा अभ्यासक सुनील अग्रवाल यांनी दिली आहे.