‘व्यापारी- माथाडी कामगार बचाव कृती समिती'ची लवकरच स्थापना- नरेंद्र पाटील

तुर्भे : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील माथाडी-मापाडी कामगार आणि व्यापारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘व्यापारी आणि माथाडी बचाव कृती समिती' लवकरच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती बाजार पेठांमधील माथाडी-मापाडी कामगार आणि व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘व्यापारी असोसिएशन' पदाधिकाऱ्यांची बैठक माथाडी भवन मध्ये नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

राज्य पणन संचालनालयाने १६ जानेवारी २०२४ रोजी काढलेले परिपत्रक रद्द करणे, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाढविणे,कोल्ड स्टोरेजमध्ये केला जात असलेला अनधिकृत व्यवसाय थांबविणे,माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत घेणे, सल्लागार समिती आणि माथाडी बोर्डाची पुनर्रचना करणे यांसह व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘व्यापारी आणि माथाडी बचाव कृती समिती'ची स्थापना करण्यात येणार आहे. ‘समिती'च्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यास विधायक मार्गाने तीव्र आंदोलन करण्याची भूमिका ‘व्यापारी आणि माथाडी बचाव कृती समिती'च्या माध्यमातून घेण्याचा निर्णयही सदर बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील कांदा-बटाटा मार्केट, मसाला मार्केट, दाणाबंदर मार्केट, भाजीपाला आणि फळ मार्केट मधील ‘व्यापारी असोसिएशन'चे पदाधिकारी मोहन गुरनानी, शंकर पिंगळे, संजय पानसरे, चंद्रकांत ढोले, कैलास तांजणे, अशोक बढीया, भिमजी भानुशाली, संजय पिंगळे, दत्तात्रय पिसाळ, अमरीश बारोट,मयुर सोनी तसेच ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील,जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, कायदेशिर सल्लागार ॲड. भारतीताई पाटील यांच्यासह बाजार समिती अधिकारी उपस्थित होते.
‘व्यापारी आणि माथाडी बचाव कृती समिती'ची स्थापना होण्याकरीतां मालक प्रतिनिधी आणि असोसिएशन पदाधिकाऱ्यांची नावे घेतली जाणार आहेत. तसेच गठीत होणाऱ्या समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत, असे  माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील माथाडी-मापाडी कामगार आणि व्यापारी यांच्या न्याय प्रश्नांकडे महाराष्ट्र राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यास सरकार विरोधात विधायक मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. - नरेंद्र अण्णासाहेब पाटील, नेते - महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मधील ४ फुटबॉल मैदानांचे काम पूर्ण