शब्दवेल साहित्य मंचचे कविसंमेलन उत्साहात संपन्न

पनवेल ः पनवेल येथील ‘के.गो.लिमये वाचनालय'मध्ये २७ जानेवारी रोजी जाई फाउंडेशन संचालित ‘शब्दवेल साहित्य मंच' संस्थेचे एक दिवस कवितेसाठी हे कविसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनास अध्यक्ष म्हणून शब्दवेलच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षा  कवयित्री योगिनी वैदू, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका प्रा.प्रतिभा सराफ, लेखक-समीक्षक शिवाजी गावडे उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दवेलचे अध्यक्ष प्रविण बोपुलकर यांनी केले. या अनुषंगाने आयोजित काव्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून गझलकार कमलाकर राऊत, स्वाती गावडे आणि कविता राऊत यांनी काम पाहिले. एकूण ३५ कवांीमधून कवी रामबंधु खंडू अंढागळे, चेंबुर यांना प्रथम, कवयित्री अक्षदा गोसावी, नेरूळ यांना द्वितीय तर कवी विलास पवार, पनवेल यांना तृतीय तर बालकवी समर नितीन मोतलिंग यांस उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रा. प्रतिभा सराफ यांनी आपला काव्यप्रवास रसिकांसमोर उलगडला आणि नवकवींना काव्यसादरीकरणाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात कवयित्री योगिनी वैदू यांनी कवितेच्या निर्मिती प्रक्रियेवर भाष्य केले. 

याप्रसंगी विविध सामाजिक विषयांवर उपस्थित कवींनी सादर करून रसिकांची दाद मिळवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्दवेलचे केंद्रीय संघटन प्रमुख देवेंद्र इंगळकर यांनी केले तर शब्दवेलचे रायगड जिल्हाध्यक्ष विलास पुंडले यांनी आभार मानले. प्रत्येक महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त साहित्यिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष प्रविण बोपूलकर यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ.आनंदराव सूर्यवंशी यांचा ‘अहिराणी बोलस गीता' ग्रंथ प्रकाशित