पनवेल पालिकेचे 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान

पनवेल:  पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान  दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आज प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.

 कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेचा वैद्यकिय आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. या अभियानांतर्गत आपआपल्या स्तरावर प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपक्रम राबविणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दिनांक ३० जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरती कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानूसार मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या सूचनेनूसार येत्या 15 दिवसात कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिका आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा(कृष्ठरोग) अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानातून हे कार्यक्रम होणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 येथे सर्व आरोग्य विभागातील कर्मचा-यांची रॅली होणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 मध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र४  येथे शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा होणार आहेत.तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 येथे कुष्ठरोगाविषयी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाविषयी जनजागृती या विषयावर आधारित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ६  येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने डॉ.वैभवी निंबाळकर आणि उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने अर्जुन ठाकूर सर्व कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही