मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
कविता डॉट कॉमचा ४२ कार्यक्रम काेंडे यांच्या काव्यगायनाने गाजला
ग्रामसंस्कृतीचे सदिच्छादूत वासुदेवांचा विचारमंचावर बसवून सन्मान
नवी मुंबई : रा.फ.नाईक महाविद्यालय, कोपरखैरणे येथे कविता डॉट कॉमच्या ४२ व्या कार्यक्रमात कवीमनाचे प्रसिध्द निवेदक, नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे यांनी आपल्या ‘बावनकशी' सादरीकरणाने रंगत भरली.
२८ जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभीच महाराष्ट्राच्या ग्रामसंस्कृतीमधील प्रबोधनाचे सदिच्छादूत असलेल्या तीन वासुदेवांना पाचारण करुन व त्यातील ज्ञानेश्वर गोंडे यांना विचारमंचावर बसवत गाणी गायला लावून कविता डॉट कॉमचे निर्मिती सूत्रधार प्रा. रविंद्र पाटील यांनी एक वेगळाच पायंडा पाडला. महेंद्र काेंडे यांनी मग आई, कन्या, घर, समाजमाध्यमे, शेती, ग्रामीण जीवन, पावसाळा अशा विविध विषयावरील एकाहुन एक कविता साभिनय सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या काही कवितांच्या सादरीकरणाने रसिकांच्या डोळ्यात पाणी आणले तर काही कवितांमुळे श्रोतृवृंदातून हास्याच्या लकेरी उडाल्या. काेंडे यांची एक कविता चि. प्रसाद माळी यानेही म्हणून दाखवत उपस्थितांची वाहव्वा मिळवली. अंमळनेर येथे पार पडणाऱ्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या नवी मुंबईकर कवी वैभव वऱ्हाडी यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन नारायण लांडगे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ गजलकार आप्पा ठाकूर, संतोष अभंग, ‘नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत, पत्रकार बाळासाहेब धारकुडे, अनिलकुमार उबाळे, रांगोळीकार श्रीहरी पवळे, गोरखनाथ पोळ, ‘केतकी प्रकाशन'चे संचालक चंद्रकांत जाधव आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कवी जितेंद्र लाड तसेच कविता डॉट कॉमच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.