२८ जानेवारी रोजी भाजी मार्केट सुरु; कोंडी फुटल्याने शेतमालाची आवक

वाशी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई शहराकडे निघालेल्या ‘मराठी मोर्चा'चा वाशी मधील एपीएमसी बाजार आवारातील मुक्काम वाढल्याने अनेक शेतमालाच्या गाड्या बाहेर उभी करण्याची वेळ आली होती. मात्र, एपीएमसी बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी सुट्टीच्या दिवशी भाजीपाला बाजार आवार खुला ठेवल्याने अनेक  शेतकऱ्यांच्या शेतमालाची कोंडी फोडली. एपीएमसी बाजार आवारात २८ जानेवारी रोजी ४०० गाड्या शेतमाल आवक झाली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी मुंबई शहरात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, ‘मराठा मोर्चा' २५ जानेवारी रोजी वाशी मधील एपीएमसी बाजार आवारात मुक्काम करुन २६ जानेवारी रोजी मुंबई शहराकडे कूच करणार होता. त्यामुळे आंदोलन कर्त्यांची कुठली गैरसोय होऊ नये म्हणून २५ जानेवारी रोजी पाचही एपीएमसी बाजार आवार बंद ठेवण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला होता.मात्र, २६ जानेवारी रोजी  मागण्या मान्य न झाल्याने आणि मुंबई पोलिसांनी विनंती केल्याने ‘मराठा मोर्चा'चा मुक्काम आणखी एक दिवस एपीएमसी बाजार आवारात वाढला. त्यामुळे शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांना एपीएमसी बाजार आवारात प्रवेश मिळाला नसल्याने भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची अनेक वाहने एपीएमसी बाजार आवाराबाहेर उभी होती. यातील काही शेतकऱ्यांनी एपीएमसी बाजार बाहेर शेतमाल विक्री करण्याचा प्रयत्न केला. तर घाऊक ग्राहक नसल्याने शेतकरी आर्थिक नुकसानीच्या कोंडीत अडकला होता. मात्र, मराठा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्याने ‘मराठा समाज'ने नवी मुंबई मध्ये  गुलाल उधळला.त्यांनतर आंदोलक परतीच्या प्रवासाला लागले आणि रात्री ८ वाजेपर्यंत एपीएमसी बाजार आवारातील आंदोलकांची वाहने बाहेर पडली. त्यामुळे एपीएमसी बाजार आवार रिकामा होताच बाहेर उभ्या असलेल्या शेतमालाची वाहने आत घेण्यात आली. मात्र, भाजीपाला नाशिवंत शेतमाल असल्याने तो खराब होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार होते.त्यामुळे आधीच तीन दिवस भाजीपाल्याची तुटलेली साखळी आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळावे म्हणून २८ जानेवारी रोजी सुट्टीच्या दिवशी एपीएमसी भाजीपाला बाजार खुला ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची कोंडी फुटली.

एपीएमसी बाजारात २८ जानेवारी रोजी ४०० गाड्या शेतमाल आवक झाली. तर शोतमाल दरात ५ ते १० टक्क्यांची हलकी दरवाढ झाली, अशी माहिती ‘एपीएमसी भाजीपाला मार्केट'चे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कविता डॉट कॉमचा ४२ कार्यक्रम काेंडे यांच्या काव्यगायनाने गाजला