रस्त्यावर गॅस सिलेंडर हाताळणी

वाशी : वाशी मधील जुहूगावच्या दोन्ही बाजूला रस्त्यावरच गॅस  हाताळणी केली जाते. त्यामुळे सदर गॅस हाताळणीवेळी जर अपघात झाला तर संपूर्ण जुहूगावाला धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे रस्त्यावर गॅस हाताळणी करणाऱ्या गॅस वितरकांवर कारवाई  करावी, अशी मागणी ‘जुहूगाव ग्रामस्थ मंडळ'चे अध्यक्ष हिमांशू पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबई शहरात जागो-जागी शहरी वस्तीत घरगुती आणि  व्यावसायिक गॅसने भरलेली वाहने उभी करुन याच ठिकाणी गॅस हाताळणी केली जात आहे. वाशी मधील जुहूगाव परिसरात देखील रस्त्यावर गॅस हाताळणी केली जात आहे. जुहूगावाच्या पूर्व बाजूला मरीआई मंदिर जवळ आणि पश्चिम बाजूला गावदेवी मैदानाजवळ रस्त्यावरच गॅस  हाताळणी करुन गॅस सिलेंडर विक्री केली जाते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय रस्त्यावरच गॅस सिलेंडर हाताळणी केली जात असल्याने भविष्यात जर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची  शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत नवी मुंबई महापालिका, पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील कारवाई केली जात नाही.त्यामुळे भविष्यात  गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन मोठी हानी झाल्यावर प्रशासन जागे होईल का?, असा सवाल करत संबधीत गॅस वाहनांवर तात्काळ कारवाई करुन त्यांना शहरी भागात रस्त्यावर गॅस सिलेंडर हाताळणी करण्यात कायम बंदी घालावी, अशी मागणी ‘जुहूगाव ग्रामस्थ मंडळ'चे अध्यक्ष हिमांशू पाटील यांनी केली आहे.

रस्त्यात गॅस, ज्वलनशील पदार्थ हाताळणी तसेच वाहतुक कोंडी आणि रस्त्यात अतिक्रमण करुन व्यवसाय करणे बाबत अनुक्रमे पोलिसांना मुंबई पोलीस अधिनियम, वाहतूक पोलिसांना मोटार वाहन अधिनियम अंतर्गत तर महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि एमआरटीपी कायद्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेला अधिकार आहेत.

जुहूगाव मधील गावदेवी मैदान लगतच्या रस्त्यावर मोठे ट्रक पार्किंग करुन त्यात असलेले गॅस सिलिंडर रस्त्यावरच विकले जातात. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास नवी मुंबई महापालिका आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आपले हात झटकलेले दिसत आहेत. रस्त्यावरच होत असलेल्या गॅस सिलेंडर हाताळणी बाबत स्थानिक पोलीस ठाणे मध्ये तक्रार करुन देखील कोणतीही कारवाई होत नाही. - हिमांशू पाटील, अध्यक्ष - जुहूगाव ग्रामस्थ मंडळ, जुहूगाव.

वाशी परिसरात गॅस गोडाऊनसाठी जागा आहेत का?. गॅस वितरण प्रणाली नागरी हिताची सुविधा आहे. त्यामुळे रस्त्यावर गॅस सिलेंडर हाताळणी करण्यात येत असल्याची तक्रार असेल तर ती कुठल्या कायद्या प्रमाणे घ्यावयाची ती सांगा. त्यानुसार तक्रार घेऊन कारवाई करण्यात येईल. - शशिकांत चांदेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक -वाशी पोलीस ठाणे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 कॉरिडोर बाधित शेतकरी देणार न्यायालयात आव्हान