‘उत्सव अयोध्याचा, आनंद चिरनेरकरांचा'

उरण : प्रभु श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीत २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात आला आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून चिरनेर या ऐतिहासिक प्रसिध्द गावातील श्री राम मंदिरात अयोध्या येथून आणलेल्या श्री रामाच्या मुर्तींचे दर्शन रामभक्तांना लाभले. श्री राम मंदिरात महायज्ञकुंड, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘उत्सव अयोध्याचा, आनंद चिरनेरकरांचा' अशी प्रतिक्रिया भाविकांमध्ये उमटली.

भगवान श्री रामाला विष्णूचा अवतार मानले जाते. भगवान विष्णुंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी त्रेतायुगात श्रीराम म्हणून मानव अवतार घेतला. प्रभू रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटे सोसूनही प्रतिष्ठित जीवनाचे उत्तम उदाहरण मांडले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला आदर्श सोडला नाही आणि जीवन सन्मानाने जगले. त्यामुळेच त्यांना सर्वोत्तम पुरुषाचे स्थान देण्यात आले आहे.

 अशा लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रामांची जन्म भूमी असलेल्या अयोध्या नगरीत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरात श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी लाखो मान्यवर आणि भक्तगणांच्या उपस्थित पार पडला. या सोहळ्याचा एक भाग म्हणून उरण शहर, तालुक्यातील अनेक गावांमधील मंदिरात पालखी सोहळ्यासोबतच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चिरनेर या ऐतिहासिक प्रसिध्द गावात देखील श्री राम जन्म उत्सव सोहळा गेली २०० वर्ष साजरा केला जातो. अशा श्री राम मंदिर जिर्णोध्दार कमिटीने अयोध्या येथून आणलेल्या श्री राम मंदिरातील मुर्तीना अभिषेक सोहळा सकाळी चिरनेर गावातील दानशूर व्यक्ती राजाशेठ खारपाटील या दाम्पत्याच्या हस्ते पार पडला. यावेळी मंदिरात काकड आरती, हरिपाठ, भजन, महा यज्ञकुंड अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत अयोध्या नगरी प्रमाणे चिरनेर उरण नगरी श्री रामाच्या नावाने दुमदुमली होती. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी पनवेल महापालिकेकडून मन्युष्यबळ उपलब्ध