ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
शस्त्र प्रदर्शन'मध्ये बच्चे कंपनीपासून थोरांनी हाताळली शस्त्रे
नवी मुंबई : सैनिकांकडून युध्दात प्रत्यक्षात वापरण्यात येत असलेले अत्याधुनिक शस्त्रे लहानांपासून ते थोरापर्यंत सर्वांनाच प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळाली. कोकण भवन मधील ‘शासकीय-निमशासकीय माजी सैनिक संघटना'ने ‘थल सेना दिन'निमित्त (आर्मी डे) ‘शस्त्र प्रदर्शन'चे आयोजन करुन सदरची संधी सर्वांनाच उपलब्ध करुन दिली होती. या ‘शस्त्र प्रदर्शन'ला कोकण भवन मधील शेकडो शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शनात ठेवण्यात आलेली सर्व अत्याधुनिक शस्त्रे हाताळून वेगळ्याच प्रकारचा अनुभव घेतला.
कोकण भवन मधील ‘शासकीय-निमशासकीय माजी सैनिक संघटना'च्या (कोंकण विभाग) वतीने १५ जानेवारी रोजी ‘थल सेना दिन'निमित्त (आर्मी डे) एक दिवस सैनिकांसाठी या संकल्पनेतून कोकण भवन मध्ये ‘शस्त्र प्रदर्शन'चे आयोजन करण्यात आले होते. कुलाबा मुंबई येथील आर्मी स्टेशन मुख्यालयच्या वतीने लावण्यात आलेल्या या ‘शस्त्र प्रदर्शन'मध्ये सैनिकांकडून युध्दात प्रत्यक्षात वापरण्यात येत असलेल्या अत्याधुनिक शस्त्रे ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे सर्वांनाच सदर शस्त्रे प्रत्यक्ष हाताळून पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यामुळे बच्चे कंपनी पासून ते शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी देखील अत्याधुनिक शस्त्रे स्वतः प्रत्यक्ष हाताळून एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला. या ‘प्रदर्शन'ला कोकण भवनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह शेकडो विद्यार्थी आणि बच्चे कंपनीने भेट दिली.
‘महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण मुंबई'चे सदस्य रमेश जैद, ‘शासकीय-निमशासकीय माजी सैनिक संघटना'चे पदाधिकारी अजित न्यायनिर्गुणे यांच्या संकल्पनेतून आयोजित सदर कार्यक्रमात आर्मी डे निमित्त रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते. राज्य रक्त संकलन परिषद (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत खारघर येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबीरात कोकण भवन मधील अधिकारी-कर्मचारी, पोलीस आणि इतर संस्था-संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ‘माजी सैनिक संघटना'च्या वतीने चषक, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.