१९८४ सालच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली

उरण : दास्तान आणि नवघर येथील गोळीबारातील शेतकरी हुतात्म्यांना १६ जानेवारी रोजी जासई स्मारकात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक भूमीपुत्रांचे योग्य पुनर्वसन आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लागणे हीच आंदोलनातील शेतकरी हुतात्मे आणि शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांना खरी आदरांजली असेल, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र काम करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.


१६ आणि १७ जानेवारी १९८४ या दिवशी ‘उरण'मध्ये शासनाच्या नवी मुंबईकरिता करण्यात येत असलेल्या भूसंपादनाला सिडको बाधित शेतकऱ्यांनी ‘दिबां'च्या नेतृत्वाखाली विरोध दर्शविला होता. यावेळी पोलीस यंत्रणेने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीमार, गोळीबार केला होता. या शेतकरी लढ्याचा ४० वा हुतात्मा दिन १६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयातील ‘एनसीसी'च्या विद्यार्थ्यांनी मांवनदना दिली. देशात गाजलेल्या १९८४ च्या शेतकरी आंदोलनात १६ जानेवारीला दास्तान फाटा येथे झालेल्या गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले) आणि रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतूम) या दोन शेतकऱ्यांना वीर मरण आले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारी रोजी नवघर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवरही गोळीबार झाला. या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील (पागोटे) या पिता-पुत्राने हौतात्म्य पत्करले.

अशा गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी धुतूम, चिर्ले आणि जासई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार जयंत पाटील, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, जे. एम. म्हात्रे, दिनेश पाटील, रवींद्र पाटील, महादेव घरत, ‘धुतूम'च्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, ‘जासई'चे सरपंच संतोष घरत, प्रेमनाथ ठाकूर, जितेंद्र घरत, प्रकाश ठाकूर, नरेश घरत तसेच ‘दिबां'चे पुत्र अतुल पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अभय योजना'चा ठाणेकरांनी घेतला लाभ