महेंद्र काेंडे यांच्या ‘कविता बावनकशी' सादरीकरणास रसिकांची चांगली दाद

नवी मुंबई : नवरंग साहित्य संस्कृती आणि कला - नवी मुंबई या मंडळातर्फे नवी मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी, निवेदक लेखक आणि कवी महेंद्र कोंडे यांचा ‘कविता बावनकशी' हा एकपात्री कविता सादरीकरणाचा कार्यक्रम १४ जानेवारी रोजी स्टर्लिंग कॉलेज, नेरुळ-सीवूड्‌स येथे संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ आध्यात्मिक अभ्यासक आणि लेखक ह. भ. प. देविदास पोटे तसेच साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवर डॉ. ह. भ. प. देवीदास पोटे, डॉ. प्रा. अजित मगदूम, वृषाली मगदूम, आप्पा ठाकूर, ललित पाठक, साहेबराव ठाणगे, डॉ. अशोक पाटील, अशोक पालवे, प्रा. रविंद्र पाटील, वैभव वऱ्हाडी, प्रसाद माळी, पत्रकार अनिलकुमार उबाळे, राजेंद्र बनसोडे, कृष्णांत संकपाळ आदि उपस्थित होते.

 ‘कविता बावनकशी' च्या उत्तरोत्तर रंगणाऱ्या कार्यक्रमात वक्ते, कवी कोंडे यांनी नवी मुंबईमधे यानिमित्त पहिल्यांदाच पार पडलेल्या सादर या कार्यक्रमात ‘क्रीम रसिक श्रोते' म्हणजे गुणग्राहक, उच्च प्रतिभावंत रसिकांसमोर सादरीकरण करण्याची नामी संधी लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ‘यालाच प्रेम म्हणतात नं ?' ‘राधेकृष्ण', सखी सारखा पाऊस', ‘पाऊस म्हणजे', ‘पाऊस झिम्माड झिम्माड' ही गेय कविता, ‘हे असं का होत मित्रा' ही आर्तता, ‘घर दोघांच असतं', ‘सहोदर'(भाऊ-भाऊ), ‘बाप, ‘माझी मुलगी' हे आशयसंपन्न काव्य, ‘आय ॲम मराठी', कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्यासमोर सादर केलेली कविता ‘दाटून येतात मेघ जसे', लक्षवेधी भाव खाऊन गेलेली कविता ‘रुमाल', ‘कविता नवी मुंबईची' अशा विविध विषयावरील काव्यखजिना रसिकांसमोर रिता केला. नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, नवी मुंबई या मंडळाच्या बकुळ-बाग कवी-कट्ट्यावरील काव्यप्रेमी कवी कवयित्रींचा काव्ययज्ञ सुरु झाल्याला याबरोबरच नऊ महिने झाल्याचे सांगण्यात आले. नवरंग मंडळाचे अध्यक्ष गज आनन म्हात्रे यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यवाह घनश्याम परकाळे यांनी कवी महेंद्र कोंडे यांच्या कवितांची पेरणी करीत निवेदनाची गुंफण केली. कोषाध्यक्ष श्रीमती पाकिजा अत्तार यांनी उपस्थितांचे आभार मानले. अरुण द. म्हात्रे यांनी स्वागत गीत गायले. नवरंगचे कार्यकारिणी सदस्य श्यामराव सुतार, विलास राजुरकर व मनोहर जामदार, बबिता, महादेव देवळे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. मकरसंक्रांतींच्या पूर्वसंध्येला संपन्न झालेल्या या कार्यक्रमात काव्य सुमनांसोबत तीळगुळ देऊन रसिकांचे तोंड गोड करण्यात आले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाण्यात निघणार श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक