पनवेल मध्ये रंगणार कबड्डीचा थरार!

पनवेल : पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा येत्या १६ जानेवारी २०२४ रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून शेकाप आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १४ जानेवारी रोजी ११ वाजल्यापासून शेकाप-पनवेलच्या पुढाकाराने व्ही. के. हायस्कूलच्या भव्य पटांगणावर महिला आणि पुरुष गटातील कबड्डी सामन्यांचा थरार पनवेलकरांना पाहायला मिळणार आहे, अशी माहिती ‘शेकाप'चे जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी दिली. सकाळी ८ वाजता याच ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट'च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

शेतकरी कामगार पक्ष उलवे नोड-२, आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ सेक्टर-८/९/१० रहिवाशी संघटना, आम्ही कोकणकर संघटना  यांच्या माध्यमातून १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत उलवे, सेवटर-८ मधील कोपर तलाव येथे मोफत आरोग्य शिबीर, मोफत नेत्र तपासणी आणि ऑपरेशन, ओपन जिमचे भूमीपुजन, बस थांबा आणि वाचनालय उद्‌घाटन अशाप्रकारे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

१५ जानेवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि आर झुनझुनवाला - शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून जे. एम. म्हात्रे यार्ड, शिवमंदिर (पळस्पे) शेजारी, पळस्पे फाटा, पनवेल येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी ९११२२७९००० / ७५०६४१८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

१५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मोफत आयुष्यमान कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन शेकाप-खांदा कॉलनी यांच्यातर्फे खांदा कॉलनी, सेवटर-१३ मधील देवी आंबा माता मंदिर येथे करण्यात आले आहे, असे माजी उपनगराध्यक्ष श्री गणेश पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता व्ही. के. हायस्कूल येथे नववर्ष सुगंध संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील प्रसिध्द गायक ऋषिकेश रानडे, मधुरा दातार, चैतन्य कुलकर्णी, रसिका गानू आपल्या स्वरांनी पनवेलकरांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमात हार्मोनियम आणि संगीत संयोजन पराग माटेगांवकर यांचे आहे, तर सिनेअभिनेते विघ्नेश जोशी निवेदन करणार आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रांगोळी मधून भगवान श्रीरामाला मानवंदना