चिर्ले ग्रामस्थांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

उरण : बहुचर्चित ‘शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक'चे (अटल सेतू) काम पूर्ण झाले असून या ‘अटल सेतू'चे लोकार्पण १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे २१,२०० कोटी रुपये खर्चाच्या आणि २२ किलोमीटर लांबीच्या ‘सेतू'चा मार्ग ज्या ठिकाणी संपतो, त्या चिर्ले गांवच्या ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने १२ जानेवारी रोजी उद्‌घाटन सोहळ्यावेळी जन आंदोलनाची हाक दिली होती. या इशाऱ्याची तातडीने दखल घेत कोकण विभागीय आयुवतांनी घेतलेल्या बैठकीमध्ये संबंधितांकडून चिर्ले गावातील विकासात्मक कामासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्याने चिर्ले ग्रामस्थांनी १२ जानेवारी रोजी पुकारलेले जन आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

 ‘शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक' अर्थात ‘अटल सेतू' मुंबई येथून सुरु होऊन उरण तालुक्यातील चिर्ले गाव येथे संपणार आहे. चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीत या मार्गाचा समारोप होणार आहे. ‘शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' प्रकल्प राबविताना ‘एमएमआरडीए'ने आणि महाराष्ट्र शासनाने चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे आणि नुकसानग्रस्त बाधितांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एमएमआरडीए आणि महाराष्ट्र शासनाने दिलेले वचन न पाळल्याने ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले आणि ग्रामस्थांतर्फे १२ जानेवारी रोजी ‘अटल सेतू'चा जिथे मार्ग संपतो, त्या चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मार्गालगत जन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

यानंतर चिर्ले ग्रामपंचायतचे सरपंच सुधाकर पाटील आणि चिर्ले ग्रामस्थ तसेच कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, ‘एमएमआरडीए'च्या अधिकारी विद्या केणी, ‘रायगड जिल्हा परिषद'चे अध्यक्ष भरत बास्टेवाड, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकार, ‘चिर्ले'चे ग्रामसेवक वैभव घरत यांची संयुक्त बैठक सीबीडी मधील कोकण आयुक्त कार्यालय येथे पार पडली.या बैठकीत सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी चिर्ले गावातील विकासात्मक कामासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. यावेळी ‘एमएमआरडीए'च्या अधिकारी विद्या केणी यांनी सर्व विकास कामे पूर्ण करु, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे ‘चिर्ले'चे सरपंच सुधाकर पाटील आणि चिर्ले ग्रामस्थांनी एकत्रित गाव बैठक घेऊन १२ जानेवारी रोजी ‘एमएमआरडीए'च्या विरोधात पुकारलेले जन आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत आणि चिर्ले ग्रामस्थांच्या मागण्या रास्त आहेत. जनतेला कोणत्याही समस्या उद्‌भवणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. तसेच चिर्ले ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याची सूचना एमएमआरडीए, सिडको, जिल्हा परिषद यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने १६ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे या संदर्भात मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे. -महेंद्र कल्याणकर, आयुवत-कोकण विभाग. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी आरटीओ कार्यालयाचे कामकाज अखेर नव्या इमारत मधून सुरु