‘ ‘पनवेल'ला वॉटर प्लस शहर मानांकन

पनवेल : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये पनवेल महापालिकेला केंद्र शासनाच्या ‘गृहनिर्माण-नागरी व्यवहार मंत्रालय'ची सर्वोच्च मान्यता असलेले ‘वॉटर प्लस' शहर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या कामात योगदान दिल्याबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. याबरोबरच कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) ३ स्टार दर्जा पनवेल शहराला प्राप्त झाला आहे.

देशातील ४००० पेक्षा जास्त शहरांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये सहभाग घेतला होता. देशातील ५८ शहरांना यावर्षी वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील १८ शहरांना वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यात वॉटर प्लस नामांकन सर्व प्रथम पनवेल महापालिकेला मिळाले आहे. याचबरोबर जीएफसी रेटिंग अर्थात कचरामुक्त शहरांमध्ये पनवेल महापालिकेने मागीलवर्षी प्रमाणे आपला ३ स्टार रेटींगचा दर्जा टिकवून ठेवला आहे.

पनवेल महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त सचिन पवार, आरोग्य विभाग-मलनिःस्सारण विभागाने आपल्या मेहनतीचा कस पणाला लावत वॉटर प्लस मानांकन प्राप्त केले आहे. वॉटरप्लस मानांकन ओडिएफ मानांकनातील सर्वश्रेष्ठ मानांकन आहे. मापालिका क्षेत्रातील ५  मलनिःस्सारण केंद्राद्वारे १०० टक्के मलयुक्त पाण्यावर प्रक्रिया करुन २० टक्के प्रक्रियाकृत पाण्याचा पुनर्वापर केला जातो.  

महापालिकेने यावर्षी खरेदी केलेल्या दोन संक्शन कम जेटिंग मशीनद्वारे शहरातील मलनिःस्सारण वाहिन्यांबद्दल तक्रार निवारणाला गती मिळाली आहे. वॉटर प्लस मानांकनात सफाई कर्मचाऱ्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. पनवेल महापालिकेने मशिनद्वारे स्वच्छेतला महत्त्व दिले असून प्रत्येक ठिकाणी मशिन द्वारे सिवर आणि मॅनहोलची स्वच्छता केली जात आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता-दुरुस्ती करण्यासाठी ‘स्वछता हर कदम' ॲपद्वारे शौचालयांची देखरेख (मॉनिटरींग) सुरु करुन शौचालयाच्या स्वच्छतेत आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. अशा विविध उपाय योजनांमुळे पनवेल महापालिकेला वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.

महापालिकेने वारंवार कचरा वर्गीकरणाबाबत केलेल्या आवाहनाला नागरिकांमधून प्राधान्याने महिला वर्गामधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) ३ स्टार दर्जा पनवेल महापालिकेने टिकवून ठेवला आहे. यापुढेही नागरिकांनी अशा प्रकारे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी महापालिकेच्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद दिल्याने वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग सर्वात महत्त्वपूर्ण असतो. सर्व नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन. -गणेश देशमुख, आयुवत-पनवेल महापालिका.

महापालिकेने  सुरु केलेल्या ‘स्वछता हर कदम' ॲप द्वारे सार्वजनिक शौचालयांच्या मॉनिटरींग यंत्रणेची केंद्र सरकार द्वारे दखल घेण्यात आली आहे. अशा नवनवीन यंत्रणेच्या माध्यमातून घनकचरा आणि स्वच्छता विभाग अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करते आहे.
-सचिन पवार, उपायुवत-पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वस्तीतील मुलांनी सादर केला भारतीय संस्कृती, परंपरा व नृत्याचा अविष्कार