सावित्रीबाईचे कार्य म्हणजे युग कार्यच - न्या.बी.एल.वाघमारे 

नवी मुंबई : सावित्रीबाई फुले या थोर समाज क्रांतिकारक होत्या, सावित्रीबाईनी स्वत:च्या कर्तुत्वाची ज्योत प्रज्वलित केली आणि स्त्रीसुद्धा पुरुषाच्या बरोबरीने युगप्रवर्तक कार्य करु शकते हे जगाला सिद्ध करुन दाखविले. असे गौरवोद्गार माजी जिल्हा न्यायाधीश बी.एल. वाघमारे यांनी ऐरोली येथे काढले.  

ऐरोलीतील जेतवन सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी जेतवन विहार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व या विषयावर  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा न्यायाधीश बी.एल. वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉ.पी.एस.गौतम, संस्थेचे सचिव आप्पासाहेब शिवशरण, उपसचिव प्रा.व्यंकट माने व्यासपिठावर उपस्थित होते.  

यावेळी पुढे बोलताना न्या.वाघमारे म्हणाले एकोणिसाव्या शतकात स्त्रिया आणि शूद्र यांची स्थिती पशु पेक्षाही हीनदीन होती. देवाच्या व धर्माच्या नावाखाली बहुसंख्य समाज हा सर्व प्रकारच्या गुलामगिरीत गटांगळ्या खात होता, स्त्रीचा जन्म मुळी अशुभ मानला जात होता. परंतु ज्या काळात स्त्रीने शिक्षण घेणे हे महापाप मानले जात होते, त्या काळात मुळात निरक्षर असलेल्या सावित्रीबाईंनी विवाहानंतर आवश्यक तेवढे शिक्षण घेतले. प्रारंभी पतीच्या आग्रहास्तव आणि काळाच्या ओघात स्वयप्रेरणेने स्वाध्यायद्वारे स्वत:च्या अखंड कर्तुत्वाने त्या आद्यशिक्षिका, मुख्याध्यापिका समाजसेविका दिनदलिताच्या उद्धारक इतकेच नव्हे तर आधुनिक मराठी कवितेच्या गंगोत्री बनल्याचे सांगितले.  

ज्योतिबाच्या मृत्यूनंतर तर सावित्रीबाई यांनी सत्यशोधक समाजाचे नेतृत्वही सांभाळले म्हणून सावित्रीबाईचे कार्य म्हणजे युग कार्यच आहे असे गौरवोद्गार न्या.बी.एल.वाघमारे यांनी काढले. या प्रसंगी व्ही.जे.टी.आय.चे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.बी.बी.मेश्राम आणि अमेरिका स्थित प्राध्यापक डॉ. दत्ताजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब डोळस, सिद्धार्थ शिरसाळे, रवींद्र केदारे, दीपक दिलपाक, डी.जी सोनवते, ऍड.अरुण सावंत यांनी विशेष सहकार्य केले.  

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील मानाच्या पालखीचे कार्ला गडी प्रस्थान