'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात शाळांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी

 ठाणे  - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाम सहभागी होऊन शाळांना भौतिक, तांत्रिक व गुणवत्ता विकासाची संधी प्राप्त होणार आहे. `मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान शाळांसाठी आधार असून त्यामुळे शाळांना नवसंजीवनी मिळणार आहे असे प्रतिपादन उमाकांत गायकवाड, उप आयुक्त (शिक्षण) व बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी गटप्रमुख व CRC सहविचार सभेमध्ये केले.

 `मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. हे अभियान दि. ०१ जानेवारी २०२४ पासून सुरू झाले असून ते दि. १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राबविले जाणार आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मनपा शाळा व सर्व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होऊन आपली शाळा सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सदर अभियानाबाबत ऑनलाईन बैठकीद्वारे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच पत्राद्वारे लेखी सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थी केंद्रित उपक्रम व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी एकूण १०० गुण असतील. राज्यातील सर्व पालिका क्षेत्रातील शाळांमधून पहिले पारितोषिक रू. २१.०० लाख, दुसरे पारितोषिक रू. ११.०० लाख, तिसरे पारितोषिक रू. ७.०० लाख असे मनपा व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना स्वतंत्रपणे आहे असेही शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी नमूद केले.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 ‘एसएससी बोर्ड'च्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेला प्रांरभ