नोकरदार महिलांसाठी जागरुकता अभियान शुभारंभ

ठाणे महापालिका आणि कॉज फाऊंडेशन  यांचा उपक्रम

ठाणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने ठाणे महापालिका आणि कॉज फाऊंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी कायदेविषयक जागरुकता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ‘ठाणे'च्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे महापालिका उपायुक्त वर्षा दीक्षित, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, ठाणे जिल्हा महिला-बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, रेखा हिरे, ॲड. संध्या जाधव, ॲड. वैशाली रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘सुरक्षित शहर' होण्यासाठी सर्व नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी कॉज फाऊंडेशन  कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण झाल्यास अगर कौटुंबिक हिंसाचार झाल्यास ‘सुरक्षित महिला (आयसीसी)' योजनेंतर्गत, महिलांना मदत उपलब्ध करुन देण्यासाठी या अभियानाची माहिती ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, अशासकीय आस्थापनांपर्यंत पोहोचवणे, हेच महिला जागरुकता अभियानाचे प्रयोजन आहे, असे ‘कॉज फाऊंडेशन'च्या संचालिका कल्पना जितेश मोरे यांनी सांगितले.

ठाणे महापालिका मधील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमात महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात आभार प्रदर्शन ‘कॉज फाऊंडेशन 'चे अध्यक्ष जितेश मोरे यांनी केले. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेची ९ महिन्यात ४६५.७० कोटींची कर वसुली