महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; बाप-लेकाविरुध्द गुन्हा

वावंजे गांव येथील घटना

पनवेलः ‘महावितरण'च्या पनवेल विभागांतर्गत नावडे शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करणारे संदेश खुटले यांना मारहाण केल्याप्रकरणी पनवेल तालुका येथील पोलीस ठाण्यात थकीत वीज बिलधारक दत्तात्रय गोविंद पाटील आणि त्यांचा मुलगा विशाल दत्तात्रय पाटील दोघांविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासाठी विविध कलमान्वये पनवेल तालुका पोलीस ठाणे येेथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘महावितरण'चे वरिष्ठ तंत्रज्ञ संदेश खुटले आणि त्यांचे सहकारी जितेंद्र पाटील ३० डिसेंबर २०२३ रोजी नेहमी प्रमाणे थकबाकीच्या वसुलीसाठी वावंजे गांव येथे गेले होते. ग्राहक दत्तात्रय गोविंद पाटील यांची दोन महिन्याची थकबाकी असल्यामुळे त्यांना थकीत बिल भरा अन्यथा वीज खंडित करावी लागेल असे सांगितल्यावर दत्तात्रय पाटील आणि त्यांचा मुलगा विशाल पाटील ‘लाईट कशी कट करतो तुला बघतोच' अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्याचवेळी वीज कनेक्शन तोडायला पाटील यांच्या घरासमोर असलेल्या विजेच्या खांबाकडे जात असताना दत्तात्रय पाटील याने तंत्रज्ञ संदेश खुटले यांच्या गालावर जोराने चापट मारली.

त्यामुळे संदेश खुटले यांनी नावडा शाखा सहाय्यक अभियंता निलेश बुकटे यांच्या मदतीने ३० डिसेंबर रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. वीज चोरी मोहीम किंवा थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवत असताना, महावितरण अधिकारी-कर्मचारी यांना घेराव घालण्याची ग्रामस्थांची नियमित सरावाची पध्दत होती. मात्र, सदर प्रकरणामध्ये संदेश खुटले यांनी कुठलीही माघार न घेता एफ.आय.आर. करण्याबाबत ठाम असल्याचे पाहून आरोपी ग्राहकांनी क्रॉस कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी घडलेला संपूर्ण प्रकार ध्वनी चित्रफिती मार्फत रेकॉर्ड केला असल्यामुळे त्यांचा डाव पूर्णतः फसला. सदर प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहे.  

दरम्यान, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे. प्रामाणिकपणे वीजेचा वापर करावा आणि सर्व संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना दैनंदिन कामामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण'तर्फे ग्राहकांना करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुलसीदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांना, जखमींना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून मदत