ओवे डोंगराच्या पायथ्याशी उत्खनन ; महसूल विभागाचे दुर्लक्ष

पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी

खारघर : तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या ओवे डोंगराच्या पायथ्याशी उत्खनन करुन डंपरने माती दुसरीकडे घेवून जाण्यात येत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.  

तळोजा मध्यवर्ती कारागृह आणि उरण तालुक्यातील अरबी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी मातीचे होत असलेले अनधिकृत उत्खनन थांबविण्याचे आणि अनधिकृत माती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश रायगड जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, खारघर मधील तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी माती उत्खनन करुन खोदलेली माती दुसरीकडे नेण्यात येत आहे. या प्रकाराकडे  महसूल खात्याकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे पर्यावरण प्रेमी नाराजी व्यवत करीत आहेत.

ओवे डोंगराच्या पायथ्याशी उत्खनन करुन निघालेल्या मातीचा उपयोग तळोजा परिसरातील खोलगट जागेत मातीचा भराव करण्यासाठी केला जात असून, या परिसरात रात्री डंपर मोठ्या प्रमाणात सुरु असतात.

घटनास्थळी पाहणी करुन ओवे डोंगराच्या पायथ्याशी अनधिकृत उत्खननाद्वारे निघालेली माती दुसरीकडे नेणाऱ्या व्यवतींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. - विजय पाटील, तहसीलदार - पनवेल.

तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या बाजूला सिडको तर्फे मोठया प्रमाणात रोप लागवड करण्यात आली आहे. ओवे डोंगरालगत खोदकाम करुन माती घेवून जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे सिडको तर्फे लावण्यात आलेल्या झाडांची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 आष्टे लॉजिस्टिक कंपनीत ‘कोकण श्रमिक संघ'ची एन्ट्री