उत्पादनात वाढ; कांदा दरात घसरण होण्यास सुरुवात
येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा दरात उसळी
वाशी : राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाल्याने कांदा उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा घाऊक बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढत चालल्याने कांदा दरात घसरण होत असून, कांदा १६ ते २४ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.
पावसाळ्यात कांद्याचे पीक कमी आल्याने एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात मागील दीड ते दोन महिने कांद्याची आवक घटली होती. बाजारात नवीन कांदा नसल्याने जुना कांदा बाहेर काढण्यात आला होता. त्यामुळे मागील तीन आठवड्यापूर्वी कांदा ४० ते ४५ रुपयांवर गेला होता. मात्र, आता थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे परराज्यासोबतच राज्यातील बारामती, सातारा येथील नवीन कांदा एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी कांदा दरात घसरण होत चालली आहे. २२ डिसेंबर रोजी एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात ९० गाड्या कांदा आवक झाली असून, कांदा १६ ते २४ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला.
दरम्यान, सध्या कांद्याचे उत्पादन पाहता आणि शेतकऱ्यांची पुढील पिकासाठी लागणारी आर्थिक निकड पाहता कांदा दर आणखी उतरु शकतात. येत्या मार्च महिन्यापर्यत कांदा दर आणखी घसरण्याची शक्यता असून, एप्रिल महिन्यात कांदा पुन्हा उसळी घेईल, अशी माहिती एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारातील व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.
दर घसरल्यास साठवणूकदारांना फायदा?
सध्या कांद्याचे उत्पादन पाहता बाजारात नवीन कांदा विक्रीस उपलब्ध होत आहे. मात्र, जसा कांदा अधिक दाखल होत आहे तसे दर देखील घसरत असून, आगामी काळात आणखी दर घसरतील. याचाच फायदा साठवणूकदार घेत असून, पडत्या काळात अधिक कांदा खरेदी करुन त्याची साठवणूक करतात. साठवणूक केलेला कांदा एप्रिल, मे महिन्यात बाहेर काढून अधिक नपयासाठी चढ्या दराने विकला जातो, अशी माहिती एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली .